प्रतिष्ठा न्यूज

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर सांगली जिल्ह्यातील उ‌द्योगांना व्यवसायाच्या संधी; शुक्रवार पासून उद्योजक व विद्यार्थ्यांशी कंपनीचा संवाद : दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारत सरकारचा उपक्रम असलेली, Govt. Of India undertaking Public Sector Unit (PSU) हेलिकॉप्टर निर्मिती बरोबर फायटर / नागरी विमाने व इस्रो साठी लॉन्चिंग व्हेईकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (HAL) बरोबर सांगली व परिसरातील उ‌द्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून शुक्रवार पासून उद्योजकांच्या कंपनीबरोबर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स चे स्वतंत्र संचालक दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली, मिरज, कुपवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी व परिसरातील उ‌द्योगांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष श्री विनोद पाटील यांनी सांगितले की, या कार्यक्रमांमध्ये शुक्रवार, दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २.३० ते ३.३० वा. इंजीनियरिंग चे विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन प्रोग्रॅम आयोजित केला असून त्यामध्ये जिल्ह्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीची माहिती आणि विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दुपारी ०४ ते ०६ वा. सांगली व परिसरातील उ‌द्योजकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्सची माहिती व व्यावसायिक संधी या विषयावर वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली येथे चर्चासत्र आयोजित केले आहे.

या चर्चासत्रामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स, नाशिक प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. साकेत चतुर्वेदी (CEO MIG Complex, Nashik) हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स चे विविध उपक्रम, त्यामध्ये असणाऱ्या संधी याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार असून उ‌द्योजकांच्या शंकांचे निरसन देखील केले जाणार आहे.

तसेच शनिवार, दि. ०३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० पासून सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, एमआयडीसी, मिरज येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत व्यवसाय वृद्धी साठी एकास एक मीटिंग (BtoB) चे आयोजन केले आहे. याकरिता ५८ उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये व्हेंडर रजिस्ट्रेशन, उपलब्ध संधी, मागणी असलेल्या आवश्यक यंत्र सामग्रीच्या खरेदी बाबत चर्चा, प्राथमिक करार इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स, नाशिक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक शिरीष भोळे, महाव्यवस्थापक एस.मंडल व एस.ए. कोते यांचे सह खरेदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना दीपक बाबा शिंदे म्हणाले की, हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर व्यवसाय करण्यासाठी एक चांगली संधी या निमित्ताने जिल्ह्यातील उ‌द्योगांना मिळणार आहे. तरी, भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर व्यवसाय करणेसाठी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपक बाबा शिंदे यांनी केले आहे.

यावेळी विनोद पाटील, अमोल पाटील, डॉ. भालचंद्र साठे, माधव कुलकर्णी, केदार खाडिलकर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.