प्रतिष्ठा न्यूज

करणीच्या संशयातून घराघरात वाद : राहुल थोरात; कवलापूर येथे अंनिसचे चित्रप्रदर्शन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सध्या पश्चिम महाराष्ट्रात ‘करणी’ या अंधश्रद्धेचा पगडा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोणत्याही कौटुंबिक समस्येतून मार्ग काढण्यासाठी लोक जेव्हा बुवा बाबांच्या कडे जातात, तेव्हा हे बुवा बाबा ‘तुमच्या कौटुंबिक समस्येचे कारण तुमच्या घरावर कोणीतरी ‘करणी’ केली आहे आणि ती करणी करणारी व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच आहे’ असे खोटे सांगतात. त्यामुळे घराघरांमध्ये करणीच्या संशयातून वाद निर्माण होत आहेत.‌ दर महिन्याला अशा पाच-सहा केसेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येत असतात. या विषयावर लोकांची व्यापक प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून अंनिसने करणी या विषयाचे उत्कृष्ट चित्रप्रदर्शन तयार केले आहे. हे प्रदर्शन गावोगावी लावून लोकांचे प्रबोधन केले जात आहे असे प्रतिपादन अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केले.

ते आज पंडित नेहरू विद्यालय कवलापूर येथे करणी या विषयावरील चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जिज्ञासा विज्ञान मंडळाच्या मुलींच्या हस्ते काळी बाहुली जाळून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. स्मिता कबीर म्हणाल्या की, या चित्र प्रदर्शनातून मुलांच्या मनामध्ये विज्ञानदृष्टी निर्माण होईल.
विज्ञान लेखक जगदीश काबरे म्हणाले की, आपण दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर करतो परंतु वैज्ञानिक दृष्टी स्वीकारत नाही. ही दृष्टी आपण स्वीकारली तर निर्भयपणे जगू शकू.

याप्रसंगी डॉ. सविता अक्कोळे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विनोदकुमार संकपाळ यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. एस. पाटील होते.
जिज्ञासा विज्ञान मंडळाच्या मुलींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे जे. टी. लिगाडे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.