प्रतिष्ठा न्यूज

अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली, दि. 8 : एक ऑगस्टपासून महसूल पंधरवडा सुरू आहे. या कालावधीत महसूल विभागातर्फे अनेक लोकोपयोगी विविध उपक्रम राबवले जातात. मात्र हे उपक्रम राबवले जात असताना न्याय मागणीसाठी आलेल्या तक्रारकर्त्याचे समाधान ही सर्वात मोठी बाब आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत रहावे, त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल पंधरवडानिमित्त त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणे विभाग उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा उंटवाल-लड्डा, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रांताधिकारी सर्वश्री श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या कार्यशैलीवरच त्या त्या जिल्ह्याची प्रतिमा ठरते. या प्रतिमेच्या जपणुकीसाठी सर्वांनी कार्यरत रहावे, असे सांगून महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते, तलाठी भरती परीक्षेत माजी सैनिक प्रवर्गातून निवड झालेले सर्वश्री अरुण माळी, सचिन कुंभार, वसंत करांडे, बाबासाहेब माळी, दादासाहेब खोबांरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले तर सलोखा योजनेअंतर्गत लाभ दिलेले शेतकरी सर्वश्री लक्ष्मण पाटील, धनाजी पाटील, संभाजी माने, बाळकृष्ण माने यांना ७ /१२ उतारा देण्यात आला. त्याचबरोबर इ -महाभूमी अंतर्गत श्रीमती वैशाली वाले (मंडल अधिकारी ), अमोल सानप (मंडल अधिकारी ) व शिवाजी सकटे (तलाठी ) यांना लॅपटॉप व प्रिंटर प्रदान करण्यात आला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.