प्रतिष्ठा न्यूज

वायफळेतील सिद्धेश्वर मंदीरास ‌‘क’ वर्गाचा दर्जा.. माजी खा.संजयकाका पाटील,युवा नेते प्रभाकर पाटील यांचा पाठपुरावा.

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथील सिद्धेश्वर मंदीरास ‌‘क’ वर्गाचा दर्जा मिळाला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला,गावातील कृष्णदेव (लाला) पाटील यांनी याबाबत माजी खासदार संजयकाका पाटील व युवा नेते प्रभाकर पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे.मंदीरास ‌‘क’ वर्गाचा दर्जा मिळाल्याने शासनाचा अतिरिक्त निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.त्यामुळे आगामी काळात मंदीराचा कायापालट होईल.वायफळे येथील सिद्धेश्वराची यात्रा वर्षातून दोन वेळा भरते.दसऱ्यात व चैत्रात या यात्रा भरतात.मात्र यातील चैत्रात भरणारी यात्रा महत्वाची मानली जाते.1426 साली वायफळेची स्थापना झाली, असे सांगितले जाते.त्याकाळी बाभुळगाव येथून काहीजण येथे आले.त्यावेळे पासूनच या यात्रेस सुरुवात झाली.येथील सिद्धेश्वराचे मंदीर प्राचिन आहे.या मंदीरात सिद्धेश्वरा बरोबर जोगेश्वरीची मूर्ती आहे.जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून या मंदीराची ख्याती आहे.येथील सिद्धेश्वराच्या यात्रांना शेकडो वर्षांची परंपरा आहे.या मंदीरात दररोज पहाटे 5.30 वाजता देवाची आरती होते.तर प्रत्येक रविवारी संध्याकाळी धूप,आरती केली जाते.त्यानंतर आरती खंडोबाकडे भेटीसाठी नेली जाते.हा मान गावातील चांभार समाजाकडे आहे.या मंदीरात सिद्धेश्वर,जोगेश्वरी या देवांबरोबरच गणपती,नागोबा,मारुती,राधा,कृष्ण या देवांच्याही मूर्ती आहेत.हा देव नवसाला पावतो,अशी ख्याती असल्याने अनेकजण यात्रेच्यावेळी मंदीरात नारळाचे तोरण बांधतात.तर बरेच लोक दंडस्थानही घालतात.
या देवाची चैत्र शुद्ध पौर्णिमा हस्त नक्षत्रावर यात्रा भरते.यात्रेदिवशी पहाटे मंदीरात देवाची आरती केली जाते. दुपारी 12.30 वाजता देवाची पालखी निघते. गुलाल, खोबऱ्याची उधळण या पालखीवर केली जाते. हजारो भाविक या पालखी सोहळ्यावेळी उपस्थित असतात.पालखी नेण्याचा मान गावातील भ.पा.मळ्यातील लोकांचा असतो.तर पालखीसमोर मोठी सासनकाठी धरण्याचा मान गावातील येसापाच्या वाड्यातील लोकांचा असतो. तर गावातील डवरी समाज हातात डवर घेऊन पालखीसमोर असतो.या समाजातील लोक रात्री पौराणिक कथा सांगून जागर घालतात. हा देव विंग (ता. कराड) येथील भाविकांचा कुळस्वामी आहे. त्यामुळे वर्षातील दोन्ही यात्रेस विंग भागातील हजारो भक्तगण वायफळे येथे हजेरी लावतात.
दरम्यान, दुपारी 12.30 ला निघालेली पालखी खंडोबाच्या भेटीला जाते. ही पालखी दुपारी खंडोबाला तर रात्री कल्लेश्वराच्या मंदीरातील महादेवाला भेटण्यासाठी नेली जाते. यात्रेदरम्यान रात्री देशींग, खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील अनेकजण व गावातील मानकरी दिवट्या लावतात.
याशिवाय अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर मंदीरात घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्यानिमित्ताने गावातील लोक निरंकार उपवास करतात. शिवाय दसऱ्यात होणाऱ्या यात्रेत हरी जागरदिवशी (आष्टमी) यमगरवाडी (ता. तासगाव) येथील मयाबा देवस्थानची धूप, आरती आल्यानंतर सिद्धेश्वराची पालखी मंदीरातून बाहेर पडते. यानंतर यमगरवाडी येथील भाविकांचा पालखीसमोर वडाच्या झाडाखाली गज नृत्याचा कार्यक्रम होते. त्यानंतर ही पालखी खंडोबाला भेटण्यासाठी जाते. पालखी सोहळ्यादरम्यान अखंडितपणे गुलाल व खोबऱ्याची उधळण केली जाते.यात्रेच्या निमित्ताने गावातील रस्ते गुलालाने न्हाऊन निघतात. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारचे स्टॉल उभारले जातात. मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या देवाची यात्रा शांततेत पार पडते.या देवाची पूजा,अर्चा करण्याचा मान गावातील गुरव समाजाकडे आहे.या मंदीरास ‌‘क’ वर्गाचा दर्जा मिळावा,अशी गावकऱ्यांची मागणी होती.गावातील कृष्णदेव (लाला) पाटील यांच्या माध्यमातून माजी खासदार संजयकाका पाटील व प्रभाकर पाटील यांच्याकडे यासाठी पाठपुरावा सुरू होता. वायफळे ग्रामपंचायतीने यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली. अखेर या मंदीराचा ‌‘क’ वर्गात समावेश करण्याचा निर्णय झाला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.