प्रतिष्ठा न्यूज

सांगलीची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात : रावसाहेब पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली आमची चांगली असा नावलौकिक असलेल्या सांगलीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या घटना घडत आहे.सांगली ही स्व. चिंतामणराव पटवर्धन यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेली नगरी आहे. सांगली ही जगातील पहिली कैद्यांची मुक्त वसाहत निर्माण करणारी, औद्योगिक नगरी व नाट्यपंढरी म्हणून ख्यातीप्राप्त आहे. सांगली ही स्व. वसंतदादा व स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र सैनिकांची भूमी आहे. शास्त्रीय संगीत, कुस्ती, बुध्दीबळ व शास्त्रीय संगीतातील नाव कमावलेली सांगली आहे. या सांगलीत सतत घरफोडय़ा होतात. सार्वजनिक ठिकाणी गोळीबार, खूनखराबा होत आहे. दिवसा ढवळ्या सराफी दुकानात दरोडा टाकून करोडो रुपयांचे दागिने लंपास केले जातात. सांगलीत कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यामुळे सांगली भयभीत झाली आहे. दिवसा ढवळ्या असे प्रकार घडत असल्याने जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटना घडल्यावर पळापळ करण्यापेक्षा या घटना घडूच नयेत यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याने तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.
कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर होतो. सांगलीच्या शिक्षण क्षेत्रातील संस्था चालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी चिंतीत झाले आहेत. त्यांना निर्भयपणे बाहेर पडणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार रावसाहेब पाटील यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.