प्रतिष्ठा न्यूज

जिप शिक्षण विभागाच्यावतीने डिजीऑल एज्युकेशन फॉर वुमेन कार्यक्रम- डिजिटल युगात महिला शिक्षकांनी विविध विषयात स्मार्ट असणे आवश्यक : वर्षा ठाकूर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : सद्याच्या डिजिटल युगात महिला शिक्षकांनी ज्ञानार्जनाचे काम करताना विविध विषयात स्मार्ट असणे आवश्यक आहे. वाडी-तांड्यावर विद्यार्थ्यांना शिकवताना अनेक आव्हाने व अडचणी येतात परंतु त्या अडचणीवर मात करून विद्यार्थी व पालकांमध्ये कौशल्याची छाप पाडणारीच माझी शिक्षिका पुढे जाऊ शकते असे, प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी- वर्षा ठाकूर (घुगे) यांनी केले.
येणाऱ्या 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 4 मार्च 2023 रोजी तरोडा (बु ) येथील लक्ष्मी गार्डन येथे डिजिऑल एज्युकेशन फॉर वुमेन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नियोजन गौशिया वडजकर, दिलीप बनसोडे, बंडू आमदूरकर, शिक्षिका उषा हाळे व सुनीता मोगडपल्ले यांची मंचावर उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलांच्या उज्वल भविष्य घडविण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.
त्यासाठी शिक्षकातील नवनवे प्रयोग प्रभावी ठरू शकतात. शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असेही त्या म्हणाल्या. महिला म्हणून आपण सर्व जबाबदाऱ्या पार पडतो. परंतु स्वतःच्या आरोग्याकडे, योग्य आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-(घुगे) यांनी व्यक्त केले.
प्रारंभी दीप प्रज्वलन करून महाराष्ट्र गीताने कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गुजराती हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. संतोष केंद्रे दिग्दर्शित “बदल” या लघु चित्रपटाच्या पोस्टरचे विमोचन व अनिता दाने यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर(घुगे) यांच्या हस्ते करण्यात आले. बासरी वादक ऐनोद्दीन वारसी व त्यांच्या संचांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे व प्रशांत दिग्रसकर यांनी केले.सूत्रसंचालन रवींद्र पांडागळे व सुचिता खल्लाळ यांनी केले.दरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने आज घेण्यात आलेल्या महिला शिक्षिका मेळाव्यात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उषा हाळे व सुनीता मोगडपल्ले या शिक्षिकांना मंचावर बोलावून सोबतीने मंचावर बसवले. एवढेच नव्हे तर त्या दोघींनाही कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिले. सामान्य शिक्षिकेला यजमान म्हणून जो बहमान दिला त्याबद्दल सर्व शिक्षिकेंनी ठाकूर (घुगे) यांचे आभार मानले. यावेळी सिने कलावंत लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या मुलाखती बहारदार झाल्या. डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या मुलाखती घेतल्या.

-विद्यार्थ्यांमध्ये उत्तुंग भरारी घेण्याची ताकद-
यावेळी माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये उत्तुंग भरारी घेण्याची ताकद असते. एक महिला शिक्षिका म्हणून त्यांच्या भरारीला बळ देण्याचे काम करावे. डीएड झाल्यानंतर आपण शिक्षक म्हणून नोकरीला लागता परंतु शिक्षकांनी पुढे शिकले पाहिजे. जितके तुम्ही शिक्षण घ्याल तितके तुम्ही उत्तम शिकवाल, उद्या शाळेत शिकवण्याचा पाठ घरी दोन-तीन वेळा वाचून बघावा. त्यानंतर तुमचे अध्ययन, अध्यापन, विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतील. तुमचे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर होण्यासाठी यासाठी प्रयत्न करावेत. वर्गात अध्यापन, तर्क, अनुमान, विश्लेषण, संश्लेषण व प्रश्न विचारणे या पद्धतीने शिकवले तर वर्गातले प्रत्येक मूल आपल्या अध्यापनाकडे लक्ष देऊ शकतील, असेही ते म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.