प्रतिष्ठा न्यूज

करुळ घाट मार्ग अनिश्चित काळासाठी बंद निश्चित ; गणेश चतुर्थी पूर्वी घाट रस्ता सुरू होण्याची आशा धूसर

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : कोकणचे प्रवेशद्वार असलेला करूळघाट गेले आठ महिने वाहतुकीसाठी बंद आहे. घाटातील सध्याची परिस्थिती पाहता गणेश चतुर्थी पूर्वी हा घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
कोट्यावधी रुपये खर्च होऊनही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे करूळ घाट मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्याच पावसात त्याचे प्रत्यंतर आले आहे. संरक्षक भिंतीसह रस्ता वाहून गेला आहे. तर कोसळणाऱ्या दरडी व रखडलेली कामे यामुळे अनिश्चित काळासाठी घाट रस्ता वाहतूक बंद राहणार तसेच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनिवार यांनीही याला दुजोरा दिला आहे. यामुळे यंदा चाकरमान्यांचा गणेश चतुर्थीस येण्याचा प्रवास खडतर होणार आहे.
घाट रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीसह वाहतूकदार व व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका गगनबावडा,व वैभववाडी येथील बाजारपेठेला बसला आहे. यंदा गगनबावड्यात तर घाट बंद असल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे छोटे छोटे दुकानदार, टपरीवाले, छोटेहॉटेल वाले यांना धंदे बंद करण्याची वेळ आली आहे. कर्जाचे हप्ते भरताना दमछाक झाल्याचे दिसून येत आहे.
पहिल्याच पावसात घाटातील बांधलेल्या संरक्षक भिंती काँक्रीट सह रस्त्यावर वाहून गेल्याने, व दरीत कोसळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. याबरोबरच घाटातील अनेक भिंती सुद्धा खचल्या आहेत. जुलै महिन्यापासूनच दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले. सध्या घाट मार्गाची एकंदरीत परिस्थिती पाहता हा घाट मार्ग अनिश्चित काळासाठी बंद राहणार हे निश्चित आहे.

गगनबावडा ते वैभववाडी सुमारे २१ कि. मी.लांबीच्या मार्गासाठी २४९ कोटींची निवेदना काढण्यात आली. यामध्ये करूळ घाटाचा रस्ता, कॉंक्रिटीकरण, रुंदीकरण संरक्षक व आधार भिंती, मोऱ्या या कामांचा समावेश आहे.

 

घाटाचे काम जलद व्हावे याकरिता दिलेल्या डेडलाईन -१) ३१ मार्च, २) ३१ मे, ३) १० जून

करुळ घाटातील निकृष्ट कामाला चुकीचे डिझाईन व ठेकेदाराकडून करण्यात आलेले निकृष्ट काम, जबाबदार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.