प्रतिष्ठा न्यूज

डॉ. दाभोलकरांची पुस्तके समाजाला विज्ञानमार्ग दाखवतील – नीलम माणगावे; डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या 15 पुस्तकांचे सांगलीत लोकार्पण संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. पण अजूनही आपला समाज अंधश्रद्धेच्या बेड्या तोडायला तयार नाहीत. आज ही बहुतांश महिला या कर्मकांडात गुंतल्या गेल्या आहेत. आज प्रकाशित झालेली डॉ. दाभोलकरांची ही पंधरा पुस्तके महिलांच्या पायातील अंधरुढीच्या बेड्या तोडायला मदत करतील. दाभोलकरांची ही पुस्तके म्हणजे ज्ञानाच्या खिडक्या आहेत. ही पुस्तके आपल्याला विज्ञान मार्ग दाखवतील असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका नीलम माणगावे यांनी केले.

त्या आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या १५ पुस्तिकांच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

लेखिका नीलम माणगावे, डॉ.शैलबाला पाटील, नामदेव माळी आणि विद्यार्थिनींच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 15 पुस्तकांचे लोकार्पण राजमती कन्या महाविद्यालय विश्रामबाग सांगली येथे सकाळी दहा वाजता पार पडले.

अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, डॉ. दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपवण्यासाठी केलेला आहे असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांचा विचार संपवू न देण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘नरेंद्र दाभोलकरांचा विचार घरोघरी’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत डॉ. दाभोलकरांच्या या १५ पुस्तिकांची निर्मिती केली आहे. डॉ. दाभोलकरांच्या या पुस्तिकांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आज पर्यंत त्यांच्या दीड लाख प्रती संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित झाल्या आहेत.

साहित्यिक आणि माजी शिक्षणाधिकारी नामदेव माळी म्हणाले की, आपण सर्वजण प्राणी म्हणून जन्माला येतो पण आपल्याला जर माणूस बनायचे असेल तर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची पुस्तके वाचणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी अंधश्रद्धेच्या बेड्यांना गजरे न समजता त्या तोडण्यासाठी निर्भय बनले पाहिजे. मला लेखक म्हणून घडवण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मोठा वाटा आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध वैद्यक डॉ. शैलबाला पाटील म्हणाल्या की, आजकाल बाळ जन्मताच त्याच्या जन्मकुंडली सोबत त्याचा ‘घातवार’ ही काढला जातो. या घातवाराला कोणतीही शुभ कामे केली जात नाहीत. अशा नव्या अंधश्रद्धा पुढे येत आहेत. या नव्या अंधश्रद्धा झुगारण्याचे बळ डॉ. दाभोलकरांची ही पुस्तके आपणांस देतील. डॉ. शैलबाला यांनी मुलींना असे आवाहन केले की, इंटरनेटचा वापर रील बघण्यासाठी न करता, आपले ज्ञान वाढवण्यासाठी करा. इंटरनेटच्या माध्यमातून ज्या अंधश्रद्धा आपल्या माथी मारल्या जात आहेत त्यापासून दूर रहा.

प्राचार्य व्ही. बी. चौगुले यांनी स्वागत केले, प्रास्ताविक राहुल थोरात , सूत्रसंचालन आशा धनाले तर आभार डॉ. सविता अक्कोळे यांनी मानले. संयोजन महाविद्यालयाच्या ‘विवेक वाहिनी’ विभागाने केले.

या कार्यक्रमास डॉ. लताताई देशपांडे, डॉ. संजय निटवे, जगदीश काबरे, धनश्री साळुंखे, विशाखा पाटील, गीता ठाकर, त्रिशला शहा, अमित ठाकर सह राजमती कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.