प्रतिष्ठा न्यूज

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यामध्ये सीबीआयने हायकोर्टामध्ये तातडीने अपील दाखल करावे आरोपींना असे मोकाट सोडले तर यापुढे अनेक पुरोगामी विचारवंताच्या जीवाला धोका ; अंनिसचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खून खटल्याचा निकाल लागून तीन महिने उलटून गेले. त्यामध्ये तीन आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आले. त्याविरोधात मुंबई हायकोर्टात अपील करण्याचा 90 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरीही सीबीआयने अजूनही आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले नाही. तेव्हा आरोपींच्या विरोधात सीबीआयने त्वरित अपील दाखल करावे या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले.

आज डॉ. दाभोलकरांच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्ताने निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई हायकोर्टात आरोपींच्या विरोधात अपील दाखल करण्यासाठी सीबीआय कडून अक्षम्य दिरंगाई होत असून अपील दाखल करणे टाळले जात आहे. असे करणे आरोपींच्या फायद्याचे होईल. तसेच आरोपींना असे मोकाट सोडले तर यापुढे अनेक पुरोगामी विचारवंताच्या जीवाला धोका संभवतो.

पुणे सत्र न्यायालयाने दाभोलकर खून प्रकरणाच्या निकालपत्रात म्हटले आहे की, ”या आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाचा वाजवी संशय आहे, परंतु विश्वासार्ह पुराव्यांद्वारा त्यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरलेली आहे” असे कठोर शब्द सत्र न्यायालयाने निकालपत्रात वापरल्यानंतर देखील सी. बी. आय. कडून अजूनही अपील दाखल करण्यात आलेले नाही.

निवेदन पुढे म्हटले आहे की,
सत्र न्यायालयाच्या‌ निकालाकडे सी.बी.आय. चे लक्ष वेधण्यासाठी दाभोलकर कुटुंबियांनी सीबीआय च्या मुख्य संचालकांना एक निवेदन पाठवले आहे. त्याला सीबीआय कडून अजून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. या खटल्यातील तीन आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात दाभोलकर कुटुंबियांनी पीडित व्यक्तीचे कुटुंब या भूमिकेतून मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत केंद्र सरकारला अशी विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सीबीआयला निर्देश देऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्यात निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल करावे.

निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली चे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, नीलम माणगावे, डॉ. सविता अक्कोळे, नामदेव माळी, जगदीश काबरे, डॉ. लताताई देशपांडे, डॉ. शैलबाला पाटील, गीता ठाकर, आशा धनाले, प्रा. अमित ठाकर, त्रिशला शहा यांच्या सह्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.