प्रतिष्ठा न्यूज

पीक कर्ज वाटप लक्षांक पुर्ततेसाठी बँकानी आवश्यक प्रयत्न करावेत : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 19, (प्रतिनिधी) : खरीप हंगाम सन २०२२-२३ पीक कर्जवाटपाचे प्रमाण कमी असल्याने ज्या राष्ट्रीयकृत बँकेचे पीक कर्ज वाटप लक्षांकाच्या २५ टक्के पेक्षा कमी आहे, अशा बँकांनी लक्षांक पुर्ततेसाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत. ज्या बँकांचे लक्षांक पूर्तता समाधानकारक आहे, अशा बँकांनी राबवलेल्या योजना व प्रयत्न यांचे अनुकरण इतर बँकांनी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

खरीप हंगाम २०२२-२३ मधील पीक कर्जवाटपाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक महेश हरणे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकाश सूर्यवंशी व सांगली जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ज्या बँकांचे कामकाज समाधानकारक नाही अशा व इतर सर्व बँकांनी पुढील सभेस येताना ३१ ऑगस्ट पूर्वी पीक कर्जवाटप पूर्तता होणे आवश्यक आहे. २५ टक्के पेक्षा कमी कर्ज वाटप असणाऱ्या बँकांमधील शासकीय रक्कमा पीक कर्जाचा लक्षांक पूर्ण करणाऱ्या बँकांकडे वर्ग करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच जे व्यवस्थापक पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव त्यांच्या विभागीय कार्यालयास सादर केले जातील, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

खरीप पीक कर्जवाटपास पात्र असणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली व राष्ट्रीयकृत/ खाजगी/ ग्रामीण बँक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहकारी संस्था कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.