प्रतिष्ठा न्यूज

मासे दहिहंडी खेळतात तेव्हा!

न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूरचे कलाशिक्षक अशोक जाधव यांचे अप्रतिम काष्ठशिल्प

प्रतिष्ठा न्यूज
मलकापूर प्रतिनिधी : श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने सर्वत्र दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
चिंचोली ता. शिराळा येथील प्रसिद्ध काष्ठशिल्पकार आणि न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूरचे कलाशिक्षक अशोक जाधव यांनी मात्र बांबूच्या मुळ्यापासून अप्रतिम असे मास्यांची दहिहंडी असे अनोखे काष्ठशिल्प साकारले आहे. ते कलारसिकांना मनमुराद आनंद देत आहे.
काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी साकारलेल्या काष्ठशिल्पांनी कलारसिकांना नेहमीच भूरळ घातलेली आहे.

कला शिक्षक अशोक जाधव

निसर्गाच्या अदाकारीने निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांना कलात्मक रुप देवून अप्रतिम काष्ठशिल्प निर्माण करण्यात काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांची मास्टरकी आहे. निसर्गाच्या अदाकारीला कोठेही कृत्रिमतेची जोड न देता अप्रतिम काष्ठशिल्प साकारण्याची ईश्र्वरी देणगी जाधव यांना लाभली आहे.
नव्या पिढीतील उत्कृष्ट काष्ठशिल्पकार म्हणून सध्या महाराष्ट्रात अशोक जाधव यांचा नावलौकिक आहे.
त्यांच्या काष्ठशिल्पांना लाखो रुपयांची मागणी आहे परंतु त्यांनी पैशासाठी आपल्या या कलेचा बाजार न मांडता चिंचोली सारख्या खेडेगावात दर्जेदार कलादालन उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
स्वत:ची आर्ट गॅलरी साकारुन ‘खेड्याकडे चला’ हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश जाधव आपल्या जीवनात अमलात आणणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.