प्रतिष्ठा न्यूज

मानवी तस्करीवर आळा घालण्यासाठी जनजागृती गरजेची : विश्वास उदगीरकर

प्रतिष्ठा न्यूज 
मिरज प्रतिनिधी : मानवी तस्करी हा आज एक जगातील सर्वात मोठा व्यापार मानला जात असून देशाच्या प्रत्येक भागात मानवी तस्करीचे जाळे घट्ट होत चालले आहे. वाढती मानवी तस्करी ही देशापुढील गंभीर समस्या बनली असून व्यापक प्रमाणात याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे मत ओयासीस इंडिया या संस्थेचे श्री. विश्वास उदगीरकर यांनी केले. मिरजेतील कन्या महाविद्यालयात ओयासिस इंडिया व ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी तस्करी प्रतिबंध या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर होते. यावेळी सांगली जिल्हा बाल संरक्षक अधिकारी श्री. बाबासाहेब नागरगोजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाने ग्रामविकास बहूउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने केले. मानवी तस्करीबाबत जनजागृती व्हावी यासाठी ओयासीस इंडियाच्या वतीने देशभर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सध्या ही रॅली सांगलीत आली आहे. श्री. उदगिरकर यांनी ही रॅली काढण्याचा उद्देश, संस्थेचे कार्य, मानवी तस्करीचे प्रकार, त्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली. बाल संरक्षक अधिकारी श्री. नागरगोजे यांनी वेठबिगारी, गुलामी, भिख मागायला लावणे, वेश्याव्यवसाय करवून घेणे, बळजबरीने लग्न, बालकांचा दुरुपयोग याची वाढणारी आकडेवारी चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले. मानवी तस्करीबाबत असणारे विविध प्रकारचे कायदे, बालहक्क, बालकांवर होणारे अत्याचार, दुरुपयोग, बालहक्क समितीचे कार्य याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
      या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनीसोबतच, प्राध्यापक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेचे श्री. विनायक कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. जयकुमार चंदनशीवे यांनी केले. आभार रामलिंग तोडकर यांनी मानले. रासयो प्रमुख डॉ. माधुरी देशमुख व सहकार्यांनी संयोजन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.