प्रतिष्ठा न्यूज

दुष्काळी जत तालुक्यासाठी सोनेरी दिवस : 1932 कोटी रुपयांच्या जत तालुका विस्तारित म्हैसाळ योजनेस राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची सुधारित प्रशासकिय मान्यता; खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) : जत तालुक्यातील वंचित 67 गावांसाठी संजीवनी ठरणाऱ्या 1932 कोटी रुपयांच्या जत तालुका विस्तारीत म्हैशाळ उपसा सिंचन योजनेला आज रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. रविवारचा दिवस असूनही जत तालुक्यासाठी हा दिवस सोनेरी दिवस ठरला आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्री महोदयांचे दुष्काळी जत तालुका नेहमी ऋणी राहील अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार संजय काका पाटील यांनी दिली.
याबाबत खासदार संजय काका पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेला 8300 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मूळ योजनेत 10% पेक्षा जास्त बदल झाल्याने विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियम प्राधिकरण आणि वित्त विभाग यांची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अवघ्या दहा ते पंधरा दिवसात सर्व मान्यता दिल्या होत्या. एखाद्या मोठ्या योजनेला एवढ्या कमी कालावधीत सर्व मान्यता मिळवून घेण्याचे राज्यातील नवे तर देशातील पहिले उदाहरण आहे. आज सदर योजनेस सुप्रमा ची तरतूद करण्यासाठी मंत्रिमंडळापुढे विषय आला व तात्काळ तो मंजूर करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती देताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की, विस्तारित म्हैशाळ योजनेसाठी सन 2019 मध्ये मी अंकलगी ता.जत येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. तेव्हापासून आज अखेर या योजनेचा पाठपुरावा सुरू होता. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत जतच्या पाणी प्रश्नावर बैठक झाली होती.
जत तालुक्यातील वंचित 67 गावांसाठी विस्तारित म्हैसाळ योजना महत्वकांक्षी व जत तालुक्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माईलस्टोन ठरणार आहे. सदर योजनेतुन तीन टप्प्यात पाणी उपसा करून दिले जाणार आहे 26 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेसाठी 16 जानेवारीपर्यंत विविध टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल व याबाबत केंद्र व राज्य सरकार दोघांनीही निधीसाठी तरतूद देण्याचे मान्य केले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी माझी प्रत्यक्ष चर्चा झाल्याचे खासदार संजय काका पाटील शेवटी म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.