प्रतिष्ठा न्यूज

सांगलीच्या विराट मूक महामोर्च्याला हजारोंचा जनसागर येणार : सुरेश पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीयांचे पवित्र श्रध्दास्थान आहे. केंद्र शासनाने अधिसूचना प्रसिद्ध करुन ते पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे देश विदेशातील अहिंसाप्रेमी जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अधिसूचना रद्द करावी व शिखरजी पारसनाथ पर्वत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे यासाठी देशभरातून निवेदने देऊनही शासन दाद देत नाही म्हणून जैन समाजातील श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी, मूर्तीपूजक व सर्वच घटकांतील लोक रस्त्यावर उतरून लाखोंच्या संख्येने अहिंसक व शांततेच्या मार्गाने मूक मोर्चे काढून आंदोलने करीत आहेत.पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याने या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य व सुरक्षितता धोक्यात आले आहे. ती अधिसूचना मागे घ्यावी यासाठी सांगलीत दि. ९ जानेवारी २०२३ रोजी प. पू. चंद्रप्रभसागरजी ससंघ व पूज्य नियमसागरजी महाराज व पूज्य भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेनजी व जिनसेनजी यांच्या मंगल सान्निध्यात सकल जैन समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सांगली जिल्हा व परिसरातील जैन व अहिंसा प्रेमी लोक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील यांनी केले. आज क//डिग्रज व दुधगाव येथे आयोजित करण्यात मोर्चा संवाद बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘शिखरजीवरील संकट हे भारतीय संस्कृतीवरील संकट आहे.देशाच्या विकासासाठी जैन समाजाचे योगदान मोठे आहे. हा समाज आपल्या पवित्र तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कदापिही नष्ट होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शिखरजी पर्यटन स्थळ न होता पवित्र जैन तीर्थक्षेत्र म्हणूनच घोषित केले पाहिजे व गिरनार आणि पालिताणा या क्षेत्रातील दडपशाही करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे अशी सकल जैन समाजाची मागणी आहे. जैन समाजातील श्रावक – श्राविका, युवा वर्ग, वीर सेवा दल व महिला मंडळे मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत. ९ तारखेला सांगलीच्या कर्मवीर पुतळ्याजवळील पुष्पराज चौकातून स. १० वा. मूकमोर्चा निघून कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन दिले जाईल.या मोर्चात पांढरी वस्त्रे परिधान करून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी डिग्रज व दुधगावकरांना केले.
यावेळी द. भा.जैन सभेचे महामंत्री एन.डी.बिरनाळे म्हणाले, ‘या देशात संविधानातील तरतुदीनुसार जैन अल्पसंख्याक समाजाला आपली संस्कृती, धर्म, भाषा, मंदिरे व तीर्थक्षेत्रं यांचे रक्षण आणि उपासनेचा घटनात्मक अधिकार आहे. यावर अतिक्रमण चालणार नाही.कोणतेही धार्मिक तीर्थक्षेत्रं हे कधीच पर्यटन स्थळ होऊ शकत नाही. जैनाचार्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुहास पाटील म्हणाले, ‘ देशभर दिगंबर मुनी व सकल जैन समाज व्यथित झाले आहेत. मूक मोर्चा निघत आहेत. शासनाने तातडीने अधिसूचना मागे घेऊन शिखरजी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावी ही सांगली मोर्चाची मागणी आहे.’ सचिन आळतेकर व प्रविण वाडकर यांनी मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले. कसबे डिग्रज सभेत प्रा. ए. ए. मासुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मराठा समाजाचे आप्पासाहेब जाधव आणि लिंगायत समाजाचे अरुण राजमाने यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊ असे सांगितले. यावेळी फंचू चौगुले, दादा दुधगावे, वसंत चौगुले, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, ग्रामपंचायत सदस्य गोपुगडे व सुमारे ५०० हून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.
दुधगावच्या सभेत स्वागत व प्रास्ताविक कैलास आवटी यांनी केले. प्रकाश मगदूम यांनी दुधगावमधून हजारो लोक येतील असे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक अथणे यांनी केले. यावेळी भ. पार्श्वनाथ जिन मंदीर कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, पदाधिकारी व ट्रस्टी, दिलीप पाटील, विलास आवटी, गुणधर गाजी, संदीप आडमुठे, अरुण कुदळे, अनिल मडके, सुभाष कोले, रुपेश व सचिन वाडकर, प्रकाश व वैशाली मगदूम, उज्ज्वला आडमुठे, श्रावक – श्राविका, वीर सेवा दल, वीर महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दुधगाव व कसबे डिग्रजचे हजारो लोक मोर्चात सहभागी होणार आहेत असेही सुरेश पाटील म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.