प्रतिष्ठा न्यूज

भागवत नक्की आहेत तरी कोण ?

आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही प्रणाली स्वीकारण्यात आली आणि विविध जाती,धर्म त्यांच्या रुढी परंपरा,भाषा, संस्कृती आदींचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याबरोबरच विविधतेतून  राष्ट्रीय एकता आणि अखंडता यांच्याशी कुठलीही तडजोड न करता  राज्यकारभार करण्यासाठी सर्व समावेशक अशी नियमावली असावी हा उद्देश समोर ठेवून जगातील आदर्शवत अशा ‘भारतीय संविधान’ची निर्मिती करण्यात आली. लोकशाहीची एक साधी सरळ सोपी व्याख्या आहे आणि ती म्हणजे ‘लोकांनी लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेले राज्य ‘  म्हणजे लोकशाही.मात कुणीही मोठा नाही, कुणीही श्रेष्ठ नाही.कुणी उच्च नाही अथवा कुणी कुणाचा मालक नाही. भारतीय संविधानानुसार कायद्यासमोर सर्वांना समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत. खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आणि सारखे हे इंग्रजांचे आग्रहाचे सांगणे असायचे..आणि त्यांनी जेव्हा या समानतेचा कायदेशीर
हुकूम काढला तेव्हापासून विषमतेचे पुरस्कर्ते मनुवादींकडून
 इंग्रजांना हुसकावून लावण्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले हे ध्यानी घेतले पाहिजे.कारण विषमतेवर आधारित वर्ण आणि जातीव्यवस्था मान्य असणारे मनु समर्थकांना समानता मुळीच मान्य नाही. विज्ञानाने एवढी प्रचंड प्रगती केली असताना ज्ञानाची कवाडे खुली झाली असली तरी त्यांना अजूनही आपला जन्म ब्रम्हदेवाच्या मुखातून झाला आहे असेच वाटत असल्यामुळे ते सतत  स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना नीच समजात. आणि विशेष म्हणजे त्यांचे  मूळ वंशज भारताचे नसूनही आज हे स्वतः भारताचे मालक असल्याच्या आविर्भावात वागतात.
संख्येने  तर इतके अत्यल्प आहेत की, देशात कुठल्याही छोट्यांच्या छोट्या गावचा सरपंच नव्हे सदस्य म्हणूनही निवडून येण्याची पात्रता आणि क्षमता.नसताना देशातील तमाम बहुजनांना आपल्या स्वार्थासाठी संभ्रमित करुन हिंदू असे भासवून आपला राजकीय पाया मजबूत करतात आणि  त्यांच्या याच भूलथापांना भुलून आपला स्वतःचा दैदिप्यमान वारसा माहीत नसलेले इतरवेळी जाती पातळीच्या कोंडवाड्यात  कोंडण्यात येणारे  बहुजन अज्ञानापोटी स्वतःला तथाकथित हिंदू म्हणवून घेतात आणि पुढे जाऊन बहुजन हिंदूंच्या कुबड्या घेऊन सर्व सत्ता आपल्या मांडीखाली घेतात यासाठी विधी निषेध न बाळगता  कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे.कारण संघ त्यांच्या सोबतीला आहे.संघ आणि त्यांचे गुरुजींची समाज विध्वंसक  विचारधाराच पुढे जाऊन भारतीय संविधान आणि पर्यायाने भारताच्या भविष्याला घातक ठरणार आहे हे सर्वांनी वेळीच ओळखले पाहिजे.
       भागवत म्हणतात, आज भारत आणि इथल्या संविधानिक लोकशाही प्रणालीला कुठल्याही बाह्य शक्तींकडून नव्हे तर, अंतर्गत शत्रूंपासून खरा धोका आहे.हे सांगताना ते  एकीकडे चीन आपल्या हद्दीत घुसल्याच्या घटनेवर पांघरुण घालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या नियंत्रणात असलेले स्वयंसेवक मात्र सतत सीमेवर तणाव असल्याच्या बातम्या पेरत असल्यामुळे  देशातील जनता सतत  काळजी आणि भीतीच्या सावटाखाली जगत आहे. दुसरीकडे अंतर्गत शत्रू अशी मुस्लिमांची प्रतिमा तयार केली असल्याने मुस्लिमांना कुणी राहण्यासाठी भाड्याने घरही देत नाहीत. मुस्लिमांची संख्या सतत वाढतेय असे काहूर माजवले जाते.मात्र सरकारी आकडे पाहता त्यांची वृद्धी एक-दोन टक्क्यांपेक्षा अधिक  झालेलीच नाही.
तरीही,एक दिवस सगळा भारत मुस्लिम देश होईल अशी आवई उठवून लोकांमध्ये  मुस्लिम  समाजाविषयी  द्वेष मूलक भीती  पसरवली जात आहे. एकुण काय  बहुसंख्य हिंदू तरुणांमध्ये मुस्लिमांबद्दल  पराकोटीचे गैरसमज पसरवले गेले आहे.
   वास्तविक गुन्हेगाराला कोणतीही जात नसते माणसातील  ती एक वाईट वृत्ती असते परंतु एखादी छोटीशी जरी घटना घडली तरी त्यामागे मुस्लिमांचा हात असेल  असाच कयास केला जातो त्यामुळे निरपराध मुस्लिम युवक हकनाक मारले जातात चुकून वाचले तर त्यांना खोट्या आरोपांवरुन वर्षोनुवर्षे कच्च्या कैदेत सडवले जाते हे कटू असले तरी ढळढळीत सत्य आहे.
     संघाच्या मुशीत तयार झालेले मोदी इतर  देशांतील मुस्लिम नेत्यांच्या गळा भेटी  घेतानाची दृश्ये,छबी आणि बातम्या ठळकपणे आणि आवर्जून दिसतात किंबहुना प्रसार माध्यमात  तशी व्यवस्था केलेली असते मात्र देशातील मुस्लिमांच्या बाबतीत असे कधीही दिसत नाही. त्यातच संघाच्या तालमीत तयार झालेले टिनपाट पुढा-यांनी आता छत्रपती शिवराय, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील,जिजाऊ, सावित्रीमाई आदी बहुजनांच्या दैवतांची बदनामी करण्याची मोहीमच चालवली आहे.
          आज खरी गरज आहे ती सर्व समाजातील लोकांमध्ये  सौहार्द वाढवण्याची. धर्माला गौण स्थान देऊन माणुसकीने जगण्याची आणि वागण्याची.पिढ्यानपिढ्या इथे राहणारे मूलनिवासी मुस्लिम आणि ब्राम्हणेतर बहुजनात धार्मिक तेढ निर्माण करत फूट पाडून वैमनस्य टिकून रहावे असा अजेंडा राबविला जात असताना जगाला ‘ वसुधैव कुटुम्बकम’चा उपदेश देणे म्हणजे ‘दिव्या खाली अंधार असेच म्हणावे लागेल.
           मोहन भागवत  म्हणतात, हिंदू  आणि राष्ट्रीयता हीच आमची ओळख असून, सर्वांना आपले मानून सोबत घेऊन चालणे ही प्रवृत्ती आहे.परंतु  त्यांच्या या बोलण्यात तीळमात्र सत्यता नाही.ही त्यांची दोन हजार चोवीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालवलेली शुद्ध  फसवेगिरी आहे. कारण एकीकडे जीव गेला तरी बेहत्तर  मात्र हिंदू  धर्मासाठी सर्वांनी कट्टर राहिले पाहिजे असे त्यांचे स्वतःचे बोल आहेत. स्वतःला साध्वी म्हणवून घेणारी प्रज्ञा ठाकूर हिंदूंना आपल्याजवळ आणि घरात सतत धारदार चाकू बाळगण्याचे हिंसक आवाहन  करते आहे.धर्म संसद. भरवून स्वतःला महाराज,योगी स्वामी, म्हणविणारे महाभाग मुस्लिम महिलांवर सरळ सरळ बलात्कार करण्याच्या धमकीचा ठराव मांडत असताना  ते स्वतः मुस्लिमांना जर इथे रहायचे असेल तर त्यांनी खुशाल इथे रहावे.त्यांना कसलाही त्रास होणार नाही मात्र त्यांनी आपले वेगळेपण सोडले पाहिजे आणि एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती, एक नेतृत्व मानले पाहिजे अशी एकांगी विचारसरणी मानण्याची अट मुस्लिमांवर घालतात. जगाततील कुठलाही धर्म इतर धर्मियांच्या विषयी इतकी घृणा आणि द्वेष शिकवत नाही आणि कुणी सहनही करु शकत नाही.
ज्या मुस्लिम समाजाचा स्वातंत्र्य संग्रामात मोठा सहभाग होता त्या मुस्लिमांना आज देशातून निघून जावे असे दरडावले जात आहे आणि विशेष म्हणजे भागवतांची जी संघटना स्वातंत्र्य संग्रामात कुठेच नव्हती त्याच संघाच्या लोकांकडून असे सांगण्याचे धाडस केले जात आहे .
या देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखत .सर्व धर्मियांना
आपल्या रुढी परंपरा,भाषा आणि संस्कृती पाळण्याची पूर्ण मुभा जगातील एकमेव आदर्शवत असलेल्या भारतीय संविधानाने दिलेली असताना असा
फाजील धमकी वजा सल्ला द्यायला भागवत नक्की आहेत तरी कोण ? त्यांना कोण   नेमले आहे ? हिंदूंचे कुल मुख्त्यार पत्र त्यांना कुणी दिले आहे ? जर दिले असले तरी त्यांच्या राजकीय पोट पक्षाला पस्तीस ते चाळीस टक्केच मतं कशी पडतात ?सगळे हिंदू त्यांना मतदान का करत नाहीत  ? कुठल्याही संविधानिक पदावर नसताना कुणाच्या वतीने ते  हा सल्ला मुस्लिमांना देत आहेत? ते काय सरकार आहेत की या देशाचे मालक  ? ते  तर फक्त या राष्ट्राचे संविधान आणि राष्ट्रीय ध्वजाचा आदर न करणा-या आणि एका विशिष्ट धर्माचा आग्रह धरणा-या एका संघटनेचे प्रमुख आहेत. .तेव्हां त्यांनी मुस्लिमांना वेगळेपण सोडण्याचा सल्ला न देता आपण कुणीतरी वेगळे आणि श्रेष्ठ आहोत या भ्रमातून बाहेर आले पाहिजे. कारण या स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्यासमोर सर्व जण समान आहेत हे त्यांनी विसरु नये याची जाणीव करून देण्यासाठी हा शब्द प्रपंच…✍🏻
विठ्ठलराव वठारे
अध्यक्ष
जन लेखक संघ, महाराष्ट्र
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.