प्रतिष्ठा न्यूज

सावळजच्या मातीतला कोहिनूर हिरा हिराबाई पाचेगावकर : ज्योतीताई संजयकाका पाटील

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज दि. 29 : संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांना जबाबदारीची जाणीव असते. कोणतेही काम त्या जबाबदारीने करतात. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात महिलांना संधी दिली की, त्या संधीचे सोने करतात. असे गौरवोद्गार हिराबाई पाचेगावकर यांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी काढले.
सावळज ता. तासगाव येथे भारतीय जनता पार्टी व आर. पी. आय. सावळज यांच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती हिराबाई पाचेगावकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिला जाणारा मानाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ( १० लाख रुपये ) प्राप्त झाला. या निमित्ताने सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योतीताई संजय काका पाटील यांच्या हस्ते हिराबाई पाचेगावकर यांचा विश्र्वशांती बुद्धविहार सावळज येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. ज्योतीताई पाटील म्हणाल्या की महाराष्ट्रातील विविध कलांपैकी तमाशा ही लोककला टिकवण्यासाठी सावळजकरांचे मोलाचे योगदान आहे. कला मानवी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. हिराबाई पाचेगावकर या सावळजच्या मातीत सापडलेला वाढलेला रुजलेला एक मौल्यवान हिरा आहे. गेले 32 वर्ष आपले कलेची पूजा व सेवा करत त्यांनी अनेक रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जुन्या काळात मोबाईल इंटरनेट दूरदर्शन यासारख्या घटकांपासून वंचित असलेल्या तरीही समाजाशी लोककलेची असलेली नाळ जोडून ठेवण्याचे काम या कलावंतांनी केले.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आपली कला लोकांसमोर सादर करत रसिक प्रेक्षकांवर मोहिनी टाकली. या लोककलेची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडणीत सावळज करांच्या मातेचे योगदान आहे.
हिराबाई पाचेगावकर सारखे अनेक मौल्यवान हिरे या सावळज च्या खाणीत मिळाले. हे तालुक्याचे भाग्य आहे. यावेळी हिराबाई पाचेगावकर यांच्या कुटुंबाचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या मुली लता, लंका, आणि जयसिंग पाचेगावकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. व त्यांनी ही लोक कला अशीच पुढे चालवावी अशी भावना व्यक्त केली.
त्यांनी हिराबाईंना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. व कुटुंबीयांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच माननीय खासदार संजय काका पाटील यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच हिराबाईंच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा सरपंच योगेश पाटील यांनी केले. उपस्थित भाजपा मोर्चा चे अध्यक्ष ऋषिकेश बिरणे, आर पी आय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे, आर पी चे नेते अशोकराव माने, आर पी आय चे तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, वाहतूक आघाडी चे जिल्हा अध्यक्ष मुन्ना कोकणे, पत्रकार मिलिंद पोळ, पत्रकार प्रशांत कुलकर्णी पत्रकार अनिल शिंदे,पवन भिसे, गौतम कांबळे, सचिन देसाई, सुमित शिवणकर, खंडू होवाळे,अँड मिलिंद धेंडे, दिवाकर भिसे, दादासाहेब कस्तुरे, जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष प्रविण धेंडे, महावीर धेंडे व सावळज परिसर व सांगली जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी,मान्यवर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.