प्रतिष्ठा न्यूज

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार खून्यावर गुन्हा दाखल करण्याची पत्रकारांची भावना कोकण महानिरीक्षकांना कळविणार : सुनील फुलारी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्याप्रकरणी आरोपी पंढरीनाथ आंबेरकर व इतरांवर खुनाच्या गुन्ह्या सहित पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याबाबत सांगली जिल्ह्यातील पत्रकारांच्या भावना कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना कळवणार असल्याचे आश्वासन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मराठी पत्रकार परिषदेची संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला बुधवारी दिले.
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने फुलारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यात म्हंटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसा ढवळया हत्त्या करणाऱ्या रिफायनरीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासन आणि पोलिसांनी त्याच्यावर 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी गंभीर कारवाई होण्यासाठी त्याच्यावर देशात केवळ महाराष्ट्रात लागू असणारा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे जाईल. शिवाय या प्रकरणातील खुन्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करताना अधिक गंभीर कारवाई होऊ शकेल. गुन्हेगारी वृत्तीच्या आंबेरकर या व्यक्तीसाठी बातमी प्रसिद्ध केली म्हणून पत्रकाराला थेट आपल्या गाडीखाली चिरडून मारण्याचे क्रूर कृत्य केले. थंड डोक्याने अपघाताचा बनाव करून पत्रकाराची ठरवून हत्त्या केल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर आंबेरकर विरूध्द खुनाचे कलम लावण्यात आले आहे.
आम्ही खुनाचा आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला नाही तर सांगली सीआयडी कार्यालयाला आंदोलनाचा एक भाग म्हणून घेराव घालण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद म्हणून सांगली सीआयडी कार्यालयावरील घेराव आंदोलन सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने स्थगित केले आहे. मात्र आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्ह्यासाठी आमचा आग्रह कायम आहे.
रत्नागिरी येथील सर्व पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेने देखील पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.. या दबावाचा अखेर फायदा झाला असूनन आंबेरकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आंबेरकर याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम देखील लावले जावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील आम्हा सर्व पत्रकारांच्याही याच भावना असून आपण आमची मागणी योग्य यंत्रणेपर्यंत पोहोचवून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दाखल करण्यास सहाय्य करा अशी विनंती यावेळी केली.
या शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवराज काटकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, किशोर जाधव, किरण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विनायक जाधव, कुलदीप देवकुळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, अविनाश बसूगडे, अभिजित शिंदे, सुधाकर पाटील, नरेंद्र रानडे, शैलेश पेटकर, शरद जाधव, मोहन राजमाने, अक्रम शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.