प्रतिष्ठा न्यूज

अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देवू नये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. ४ (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये, अशा प्रकारचे प्रबोधन गेले दोन महिने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकारी वेगवगळ्या शाळा व महाविद्यालयामध्ये जाऊन करीत आहेत. तथापि सदर प्रकारामध्ये घट झाल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे अशा अल्पवयीन चालकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. पालकांनी व अल्पवयीन पाल्यानी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकाने धडक मोहिम सुरु केली असुन एकूण २० अल्पवयीन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन १२ वाहने जप्त केली आहेत. ही मोहिम सांगली शहर व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र राबवणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये. १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलाच्या पालकांना ३ वर्ष कारावास व 25 हजार रुपये दंडाची तरतुद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास ५ हजार रुपये व वाहन मालकास ५ हजार रुपये असा एकुण १० हजार रूपये दंड अशा शिक्षेची तरतुद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.