प्रतिष्ठा न्यूज

भुईबावडा येथील शिमगोत्सव ‘जल्लोषात’ संपन्न : गगनबावडा परिसरातील हजारो भाविकांची हजेरी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : फुलांची पुष्पवृष्टी, ‘रवळनाथाच्या नावान चांगभल’ चा जयघोष, अभिर, गुलालांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, ‘राम लक्ष्मण’ या लळीत नृत्याने कोकणातील सुप्रसिद्ध भुईबावडा येथील विशेषतः’म्हानांड’ सरता खेळ हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पालखी मिरवणूकीत भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी शंभर स्वयंसेवकांना न जमणारे काम केवळ तीन संकासुरांनी केले.
कोकणातील सुप्रसिद्ध भुईबावडा येथील शिमोगोत्सवाची ओळख सर्वदूर आहे. गेले पंधरा दिवस चालणाऱ्या एक आगळी-वेगळी परंपरा जपत असलेल्या ‘म्हानांड’ हा सरता खेळ संपूर्ण कोकणात सुप्रसिद्ध आहे. या शिमगोत्सवाची सोमवारी सांगता झाली. संपूर्ण भुईबावडानगरी विद्युत रोषणाईने फुलुन गेली होती.
रात्रौ ढोल-ताशांच्या गजरात, अबिर-गुलालांची उधळण करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘रवळनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात तब्बल दोन ते तीन तास पालखी नाचविली जाते. शिमगोत्सव हा पंधरा दिवसांचा खेळ असून शेवटच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. रात्रौ पालखी नाचविल्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा लळीत नृत्यांचा खेळ पहाटे पर्यंत खेळला जातो.विशेषतःराम-लक्ष्मण व त्राटिका(राक्षसीण) हा खेळ पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली.

शिमगोत्सव पाहण्यासाठी मुंबई, पुणे व कोल्हापूरसह भुईबावडा दशक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सोमवारी रात्री भुईबावडा बाजारपेठेला एक यात्रेचे स्वरुप आले होते.रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची रांग लागली होती. रात्रभर लळीत नृत्य आबिर-गुलालांची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, मोठ्या उत्साहात हा शिमगोत्सव संपन्न झाला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.