प्रतिष्ठा न्यूज

नांदेड दंगल प्रकरणी: माजी आमदार, सहसंपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुखांसह 12 जणांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर – “मातोश्री” मदतीला

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नांदेड जिल्हा न्यायालयाने दिलेल्या 5 वर्षांची शिक्षा सुनावल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या माजी आमदार, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख यांच्यासह शिवसैनिकांना छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने दि.17 एप्रिल 2023 रोज सोमवारी जामीन मंजूर केला आहे. या सर्व नेते आणि शिवसैनिकांसाठी “मातोश्री” होती मदतीला पक्षाने 15 जणांची दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. माजी आ.अनुसयाताई खेडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख- दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख- भुजंग पाटील, माजी सभापती- नरहरी वाघ यांच्यासह 19 जणांना दि. 11 एप्रिल 2023 रोजी नांदेड जिल्हा न्यायालयाने 5 वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार 750 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसयाताई खेडकर यांनी पक्षाच्या आदेशावरून महागाई विरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला हिंगोली गेट उड्डाणपुलाखाली दि.7 जून 2008 रोजी हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या (एम एच 20 डी 5917), (एमएच 20 डी 7348), (एमएच 20 डी 6812), ( एमएच 40 9623), (एमएच 40 8125), (एम एच 20 डी 5173) आणि महानगरपालिकेची (एमएच 26 एल 273) या गाड्यांची तोडफोड केली होती.
यावेळी काही पोलीस कर्मचारीही दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वजिराबाद पोलीस ठाण्यात हजर केले होते. एसटी बस चालक हावगीरराव पिंपराळे यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 140/ 2008 कलम 353, 332, 341, 147, 148, 143, 149, 427 आणि 336 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम तीनप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. काही आरोपींना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एच. सूर्यवंशी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हे प्रकरण सुरू असतानाच चार वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी या प्रकरणात उपलब्ध पुराव्या आधारे व साक्षीदारांचे जबाबावरून माजी आ.अनुसयाताई खेडकर, जिल्हाप्रमुख- दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्कप्रमुख- भुजंग पाटील, माजी सभापती- नरहरी वाघ, महेश खेडकर, एडवोकेट दिलीप ठाकूर, व्यंकोबा येडे, बाळगीर गिरी, श्रीकांत पाठक, संदीप छप्परवाल, सुभाष शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, बाळू तिडके, दौलत पोकळे, नवनाथ भारती, भुजंग कावळे, बालाजी शिंदे, भाया शर्मा, आणि मनोज यादव या 19 जणांना विविध कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार 750 रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली होती.
शिक्षा सुनावल्यानंतर नांदेड वजिराबाद पोलिसांनी 18 जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची कारागृहात रवानगी केली होती. यानंतर “मातोश्री” शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी होती. यावेळी पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी 15 जणांच्या दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यानंतर जामिनासाठी मार्ग मोकळा झाला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांचे बंधू उपशहर प्रमुख रमेश पाटील कोकाटे, अंकुश पाटील कोकाटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठून उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न केले. ऍडवोकेट डॉ.साहेबराव नांदेडकर यांनी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, नरहरी वाघ, व्यंकोबा येडे पाटील, भुजंग कावळे, दौलत पोफळे, शिवाजी सूर्यवंशी, मनोज यादव, भुजंग पाटील यांच्या वतीने युक्तिवाद केला. तर तिकडे ऍडवोकेट गंगाखेडकर यांनी माजी आमदार अनुसयाताई खेडकर, महेश खेडकर आदींसाठी युक्तिवाद केला. आज 12 जणांना जामीन मिळाला. उर्वरित 7 जणांना लवकरच जामीन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जामीन मिळालेल्या सर्वांची मंगळवारी दि.18 एप्रिल 2023 रोजी कारागृहातून सुटका होणार असल्याचे समजते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.