प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा युवा सेना उद्ध्वस्त करेल : युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली / प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले आहे. तरुणाई नशेच्या आहारी जात असून त्यांच्याकडून अनेक गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. मटका, तीन पानी जुगार, अवैध दारु विक्री, गांजा, ऑनलाईन कसिनो, बेकायदा खासगी सावकारी, व्हिडिओ गेम पार्लर आदी व्यवसाय बिनबोभाट सुरु आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. हे धंदे बंद झाले नाहीत तर युवासेनेतर्फे टास्क फोर्स उभारुन ते उद्ध्वस्त केले जातील असा इशारा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. अवैध व्यवसायाबाबत युवासेनेने एल्गार पुकारला आहे.
ते म्हणाले, अवैध व्यवसायामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. गांजाला पर्याय म्हणून औषध दुकानातून नशेच्या गोळ्या ते घेत आहेत. नशेत त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडत आहेत. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात मटका, जुगार, ऑनलाईन कॅसिनो, व्हिडिओ गेम पार्लर बिनबोभाट सुरु आहे. पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. कांबळे यांनी यावेळी सांगली शहरात मटका घेतले जात असलेले छायाचित्र पुरावा म्हणून माध्यमांना दिले. याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिली.
ते म्हणाले, अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबत दोन दिवसात कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान जर येत्या काळात अवैध धंदे बंद झाले नाहीत तर युवासेनेतर्फे प्रत्येक शहरात टास्कफोर्स स्थापन करुन त्यामार्फत हे अवैध धंदे उद्ध्वस्त केले जातील. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहोत. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवासेनेने दिला. यावेळी शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख ग्रामीण आकाश माने, मनोज भिसे, सनत पाटील, वैभव माळी यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
नशेसाठी तरुण मुले औषध दुकानातून नशेच्या गोळ्या घेत आहेत. कोणत्याही चिठ्ठीविना ही औषधे दिली जातात. याबाबत कारवाई करण्याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कांबळे यांनी यावेळी केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.