प्रतिष्ठा न्यूज

बुरसटलेल्या विचारातून बाहेर पडून स्त्रियांनी स्वतः खंबीरपणे आपल्या पायावर उभे राहायला हवे – संमेलनाध्यक्षा राजश्री बोहरा; ५वे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
गोवंडी प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश – नवी मुंबई जिल्हा आयोजित ५वे सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन गोवंडी स्टेशन मनपा मराठी शाळा सभागृह येथे संपन्न झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. राजश्री बोहरा (अध्यक्षा मुंबई प्रदेश) यांनी अतिशय उत्तम रित्या महिलांची बाजू मांडत महिलांना उद्बोधन केले. परंपरागत चालत आलेल्या बुरसट विचारातून बाहेर पडून स्त्रियांनी स्वतः खंबीरपणे आपल्या पायावर उभे राहायला हवे असे प्रतिपादन बोहरा यांनी केले. आपल्या भाषणाअंती त्यांची सुप्रसिद्ध कविता ” बंड ” सादर करून स्त्रियांना व समाजाला प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक श्री शरद गोरे (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अस्खलित व अभ्यासपूर्ण मनोगतातून त्यांनी समाजाला बाबासाहेब, ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या परिवर्तनशील विचारसरणीचा पुरस्कार करण्यास अनुबोधित केले. भारतीय समाजाचे विकृत दर्शन त्यांनी आपल्या भाषणातून परखडपणे मांडले. पत्रकार हा समाजाचा आधार स्तंभ आहे. त्यांने नेहमी सामाजिक परिस्थितीची काठिण्य पातळी आपल्या लेखणीतून मांडायला हवी असे परखडपणे त्यांनी सांगितले.
संमेलनाचे प्रमुख पाहुणे श्री सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार) यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून सामाजिक जाणिवांचे भान श्रोत्यांसमोर मांडले. अनेक दाखले देऊन त्यांनी समाजातील स्त्रियांच्या विविध कार्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. सावित्री बाईंच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या शब्दातून मांडले आणि उपस्थितांच्या मनावर त्यांचे कार्य बिंबविण्याचा उत्तम प्रयत्न केला.
प्रमुख पाहुणे उपस्थित जेष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ रम नेमाडे यांनी आपल्या तडफदार वकृत्व शैलीतून वास्तव परिस्थितीचे शब्द चित्रण केले. साहित्यिकाने सत्य बोलायला कधी घाबरु नये. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा शेवटचे सत्य आहे. तो कधी ना कधी येणारच आहे. मग आहे त्या जीवनात समाजाला उपयोगी पडेल असे कार्य करावे आणि आपले जीवन सार्थकी लावावे असे निर्भिड पणे त्यांनी सांगितले.
एकूणच या विचार मंचावरून नवीन व जुन्या परंतु परिवर्तनशिल विचारांची बांधणी करण्यात आली. अशा उत्तम साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 72 साहित्यिक एकत्र आले. त्यांनी आपल्या उत्तम काव्यरचना सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी ने केले होते. जिल्हा अध्यक्ष सौ. जान्हवी कुंभारकर (सुप्रसिद्ध कवयित्री) यांनी स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली.
सौ. मनिषा साळवे ( उपाध्यक्षा) व श्री हरिश्चंद्र दळवी (उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली) यांनी उत्तम असे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम व ठोल ताशांच्या गजरात सर्वांचे स्वागत केले. शिक्षणावर आधारित एक नातुकली पेश केली त्यामुळे संमेलनाचा दर्जा अधिकच वाढला. विदर्भाचे कार्याध्यक्ष श्री नामदेव राठोड यांनी अजूनही उपेक्षित मी या विषयावर खूप सुंदर असा परिसंवाद मांडला. परिषदेचे बरेच पदाधिकारी, पत्रकार, व साहित्यिक या संमेलनास उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.