प्रतिष्ठा न्यूज

तासगाव मधील कचरा वेचक महिलांना समृद्ध बनवणारी यशोगाथा ; संवेदनशील मुख्याधिकारी आणि लाभ घेणाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : समाजातील शेवटच्या उपेक्षित आणि गरीब वर्गातील लोकांचे जीवनमान सुधारावे त्यांना समृद्धी यावी यासाठी शासन विविध योजना राबवत असते मात्र आपल्या देशात अशा योजना त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते.मात्र संवेदनशील अधिकारी व लाभ घेणाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही गोष्टी घडून आल्या तर काय होते याचे चित्र तासगाव शहरात पहायला मिळाले.येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या तेरा सदस्यांचे आयुष्य दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेच्या माध्यमातून बदलले आहे. कचरा वेचक महिलांच्या आयुष्यात झालेला मोठा बदल आज शासनाच्या माध्यमातून डॉक्युमेंटरी द्वारे टिपण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन राबविण्यात येत आहे.या अंतर्गत पतहीन असणाऱ्या माणसांना पतवान बनवण्याचे शासनाचे धोरण आहे.ज्या लोकांना बँका सिबिल,जामीनदार किंवा तारण नसल्यामुळे कर्ज देत नाहीत त्यांच्या कर्जाची हमी नगरपालिकेच्या माध्यमातून घेऊन त्यांना कर्ज देऊन उद्योग धंद्यासाठी मदत करणे जेणेकरून त्यांचे आयुष्यमान उंच व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.याच योजने अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेच्या माध्यमातून बचत गटांना पतपुरवठा केला जातो.
महालक्ष्मी महिला बचत गट तासगाव या गटाची स्थापना 11/12/2018 रोजी झाली असून त्या गटामध्ये एकूण 13 महिला सदस्य आहेत.श्री महालक्ष्मी महिला बचत गट हा गट शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील महिलांचा आहे. या गटातील महिला ‘ शहरातील कचरा गोळा करून त्यातील भंगार साहित्य गोळा करणे, तसेच ठीक ठिकाणच्या कचरा कुंडीतील लोखंडी प्लॅस्टिक साहित्य गोळा करून त्याची विक्री करून आपला उदर निर्वाह करणे हे काम करतात.तासगाव नगरपालिकेचे *मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील या कचरावेचक महिलांना एकत्र करून त्यांचा बचत गट तयार करण्यात आला,त्यांचे बँकेत बचत खाते काढून त्यांची दरमहा 200/- या प्रमाणे बचत सुरू केली.तसेच या बचत गटातील महिलांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये शहरातील आलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम दिले त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.तसेच नगरपालिकेमार्फत त्यांना 10,000/- फिरता निधि देण्यात आला.त्यामधून त्यांनी गटामध्ये अंतर्गत कर्ज व्यवहार सुरू केले.त्यांचे एकूण आर्थिक परिस्थिती पाहता सुरवातीला बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हते तेंव्हा बँक अधिकारी यांच्याशी मुख्याधिकारी पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून त्यांना 1 ले कर्ज 1,00,000/- रू चे मिळाले. त्याची 100% बचत गटाने परतफेड करून दाखविली.तेंव्हा बँकेनी त्यांची गटातील आर्थिक व्यवहार व कर्जाची 100% परतफेड पाहून त्यांना 4,00,000/- (चार लाख रुपये) कर्ज मंजूर केले.या कर्जाच्या माध्यमातून गटातील काही महिलांनी भांडी व्यवसायसुद्धा सुरू केला आहे.तसेच नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये कचरा विलगीकरण करण्याचे काम ही करत आहेत.अशा प्रकारे या गटातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्म निर्भर झाल्या आहेत.या गटातील महिलांची आर्थिक पतपेढी वाढली आहे.या गटातील महिलांची कामगिरी पाहून या समाजामध्ये महिलांचे अजून 3 महिला बचत गट तयार झाले आहे.NULM चेक प्रकल्प अधिकारी परशुराम गायकवाड यांनी यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेच्या माध्यमातून तासगाव येथील महालक्ष्मी महिला बचत गटाच्या महिलांना अर्थसहाय्यासाठी मदत झाली.या महिलांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केल्यामुळे त्यांना तब्येत चार लाख रुपयांचें कर्ज बँकेने मंजूर केले आहे.यामुळे या महिलांचें जीवनमान उंचावले आहे.ही खूपच समाधानकारक बाब आहे.
– मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील

 

महालक्ष्मी महिला बचत गट
सचिव – जमुना तुकाराम गोसावी आमच्या महालक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला तासगाव नगरपालिकेकडून कचरा विलगीकरणाचे काम मिळाले. तसेच बँकेकडून ही चार लाख रुपये कर्ज मिळाले त्यातून महिलांनी भांडी व्यवसाय सुरू केला त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.