प्रतिष्ठा न्यूज

उत्क्रांतीचा सिद्धांत मानवी जीवन उत्पत्तीचे रहस्य उलगडतो – डॉ. हमीद दाभोलकर; ‘अंनिस’च्या ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ अभियानाची सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : नुकताच एनसीईआरटीने विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे राज्यव्यापी प्रबोधनअभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अभियानाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांच्या ‘उत्क्रांती आणि देव, धर्म संकल्पना आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ यावरील जाहीर व्याख्यानाने झाली.

यावेळी डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की, उत्क्रांतीचा भाग अभ्यासक्रमातून वगळून नागरिकांना शिक्षणातून मिळणारी विज्ञानवादी चिकित्सक वृत्ती संपवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. ज्यांना देव व धर्माच्या सहाय्याने आपली राजकीय, सामाजिक सत्ता अबाधित ठेवायची आहे त्यांची दुकाने उत्क्रांतीच्या शिकवणीमुळे बंद पडतील या भीतीमुळेच उत्क्रांतीच्या सिद्धांताला विरोध होत आहे. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत वगळण्याचा निर्णय हा काही अचानक अजाणतेपणी किंवा चुकून घेतलेला निर्णय नसून सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून गेल्या सात आठ वर्षांपासून जे विज्ञान विरोधी वातावरण निर्माण करत समाजाची विज्ञानविरोधी मानसिकता मागे रेटण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्याचाच एक भाग आहे.

आपल्या भाषणात डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की,
जगातील सर्व धर्मात उत्क्रांतीचे वेगवेगळे सिद्धांत मानले जातात. सर्वच धर्मात असलेली सत्ताधारी मंडळी ‘धर्म खतरे में है!’ अशी आरोळी ठोकतात. खरे तर आज ‘धर्म खतरे में नही तर वैज्ञानिक दृष्टीकोन खतरे में है’.

डॉ. दाभोलकर आपल्या मनोगतात म्हणाले की,
जगाकडे बघण्याचा कार्यकारणभाव उत्क्रांतीचा सिद्धांत आपणास देतो म्हणून उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

आपल्या भाषणाच्या अखेरीस डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की, उत्क्रांतीच्या सिद्धांताचा अर्थ बळी तो कान पिळी असा लावत हिटलरसारख्या धर्मवंशवर्चस्ववादी नी आपले राजकीय, सामाजिक वर्चस्व अबाधित राखण्यासाठी केला. परंतु अंनिसचे ‘चला उत्क्रांती समजून घेऊया’ हे अभियान सुरू करण्यामागील अंनिसचा उद्देश्य केवळ ‘विज्ञान प्रसार’ असा नाही तर उत्क्रांतीच्या सिद्धांताने मानवी जीवन सुरक्षित करण्यासाठी मोलाची जी भर घातलेली आहे, त्याची माहिती लोकांना व्हावी तसेच ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री, विज्ञान केंद्री व्हावा असा आहे.”

जेष्ठ शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डार्विनच्या सिद्धांताचे वैज्ञानिक जगतावर झालेल्या परिणामांचा ऊहापोह केला.

कार्यक्रमाची सुरुवात सावनी गोडबोले यांच्या उत्क्रांतीवरच्या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश माने, सूत्रसंचालन राहुल थोरात,आभार सुजाता म्हेत्रे यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.