प्रतिष्ठा न्यूज

प्रा.शरद पाटील म्हणजे निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तीमंत उदाहरण : रावसाहेब पाटील; दक्षिण भारत जैन सभेतर्फे श्रध्दांजली सभा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्व.प्रा.शरद पाटील यांनी आपल्या तत्त्वाशी विचारांशी बांधिलकी जपत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत निस्वार्थ भावनेने कार्य केले. वंचित, दीन दुबळ्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशी भावना द.भा.जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी व्यक्त केली.
मिरजेचे माजी आमदार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा.शरद पाटील यांचा दि.27 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने स्वर्गवास झाला. दक्षिण भारत जैन सभेतर्फे संपन्न झालेल्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रा.शरद पाटील शिक्षणाप्रती अत्यंत संवेदनशील होते, राजकारण, समाजसेवेबरोबरच शिक्षक आणि शिक्षणसंस्थेच्या हितासाठी त्यांचे योगदान सदैव चिरस्मरणात राहील.
प्रा.ए.ए.मुडलगी म्हणाले, 50 वर्षे त्यांचे सानिध्य व प्रत्येक अडचणीच्यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. सभा आणि पदवीधर संघटनेच्या उभारणीत आणि विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
प्रा.ए.ए.मासुले म्हणाले, राजारामबापूनंतर कार्यकर्त्यांचा काळजी करणारा, आत्मियता जपणारा निर्मळ मनाचा, शुध्द चारित्र्याचा हा एकमेव नेता होता.
प्रा.राहुल चौगुले म्हणाले, तब्बेतीची पर्वा न करता अखेरच्या क्षणापर्यंत काम करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. स्व.आमदार कळंत्रेआक्कानंतर जनमानसातून निवडून आलेला जनतेचा नेता म्हणून त्यांची सदैव ओळख राहील.
डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, प्रा.शरद पाटील हाडाचे विज्ञानवादी शिक्षक होते. सर्व क्षेत्रात कार्य करताना त्यांनी त्याचा कधीही आवंडबर माजवला नाही. राजकीय कारकीर्दीत ते कोणत्याही खोट्या प्रतारणेला कधीही बळी पडले नाहीत.
अध्यक्षीय मनोगतात सभेचे केेंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले, प्रा.शरद पाटील हे आपत्या तत्त्वाशी आणि विचारांशी सदैव पक्के राहीले. हा महाराष्ट्रातील एकमेव निस्वार्थी, निर्मळ मनाचा निष्कलंक राजकारणी नेता असावा, ज्यानी स्वत:चा सार्थ कधीच पाहिला नाही. सर्व समाजासाठी, दीन, दलित, वंचितांसाठी ते आयुष्यभर लढले, झिजले. असा नेता होणे खूप दुर्मिळ आहे. त्यांच्या स्वर्गवासाने समाजाची खूप मोठी हाणी झाली आहे. गीतांजली उपाध्ये यांचेही मनोगत झाले.
आभार व्यक्त करताना सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, पुरोगामी चेहरा म्हणून आपल्या समाजाची ओळख निर्माण करणारा एक आदर्श समाजवादी नेत्याला आपण मुकलो आहोत.
तत्पूर्वी सुरुवातीला स्व. प्रा.शरद पाटील यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. द.भा.जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रध्दांजली सभेस ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, डॉ. चंद्रकांत चौगुले, महामंत्री कमल मिणचे, ॲड. मदन पाटील, महावीर खोत, ॲड.एस.पी.मगदूम, छाया कुंभोजकर, बी.बी. शेंडगे, अभय पाटील, प्रा.डी.डी.मंडपे, प्रा. माणिक घुमाई, बाळासाहेब पाटील, अजित भंडे, अंजली कोले, मंगल चव्हाण, यागेश खोत यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.