प्रतिष्ठा न्यूज

सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणे हा मूर्खपणा : पृथ्वीराज पाटील यांनी केला तीव्र निषेध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २९ : नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे बाजूला करण्याचा मूर्खपणा काही मंडळींनी जाणीवपूर्वक केला आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महाराष्ट्रालाच नव्हे, तर उभ्या देशाला माहिती आहे, त्यांचा विचार घेऊन पुढे जाण्याची गरज असताना कुणीतरी उठतो आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने पुतळे बाजूला करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा हा प्रकार घडतो, याचे त्यांना काहीच कसे वाटले नाही ?

ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तिथे सावरकरांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याठिकाणी सावरकरांचा पुतळा ठेवण्यात आला, मात्र त्यासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवले, हे पुतळे तिथे असते तर यांचे काय बिघडले असते ? ही बाब प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला चीड आणणारी आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्याचे काहीच कसे वाटले नाही ?
या प्रवृत्तींना सावरकरांसमोर महाराष्ट्रातील थोर नेत्यांचा विसर पडू लागलेला आहे, त्यांचे त्यांना महत्त्वही वाटेनासे झाले आहे, हेच या प्रकारावरून दिसून येते. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने या प्रकाराविरुद्ध आवाज उठवायला हवा, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.