प्रतिष्ठा न्यूज

पृथ्वीराजबाबा पाटील हेच कॉंग्रेसचे आमदार; मदनभाऊ गटाला न्याय देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी मार्ग शोधावा

प्रतिष्ठा न्यूज / तानाजीराजे जाधव
सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मदनभाऊ गटाला न्याय देण्याच्या मुद्द्यावर जयश्रीताई पाटील यांनी सांगलीत विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. त्यांच्या गटाच्या आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांनी हे केले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी विधानसभेसाठी केलेली मशागत मोठी आहे. विजयाच्या उंबरठ्यावर असणार्‍या पृथ्वीराजबाबा यांना डावलून इतर कोणाला उमेदवारी द्यायची म्हणजे काँग्रेसने स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्या सारखे होईल. मदनभाऊ गटाला न्याय मिळाला पाहिजे यात कोणाचे दुमत असणार नाही परंतु त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दुसरा मार्ग शोधायला हवा. अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. २०२४ ला पृथ्वीराजबाबा हेच काँग्रेसचे सांगलीचे आमदार अशी भावना तमाम कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे.
सांगली विधान सभा मतदार संघाचा इतिहास नेहमीच राज्यात चर्चेचा राहिला आहे. वसतंदादा घराण्यातील व्यक्तींचा परावभव करण्यासाठी इतर सर्व शक्ती एकत्र येतात हे आपण आजपर्यंत पाहिले आहे. ज्येष्ठ नेते विष्णूअण्णा पाटील, मदनभाऊ पाटील यांच्या पराभावासाठी कोणी कोणी काय केले हे सर्वश्रुत आहे. बर्‍याचदा स्वकियांनीच त्यांचा घात केला आहे. मदनभाऊ पाटील यांनी दरवाजा फोडून विधानसभेत प्रवेश करून दाखविला होता. मदनभाऊ धाडसी, करारी आणि जाग्यावर निर्णय देणारे नेते होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी त्यांचा गट टिकविला. कार्यकर्त्यांच्या पाठीशी त्या ठाम राहिल्या. महानगरपालिकेच्या निवडणूकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. त्यांची जनमाणसातली प्रतिमाही चांगली आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. त्यांना महामंडळावर घेण्याचे अश्‍वासन दिले. आणि पृथ्वीराजबाबा पाटील यांना सांगली विधानसभेची उमेदवारी दिली.

मोदी लाटेनंतर सांगलीत कॉंग्रेसभवनकडे कोणी फिरकायलाही तयार नव्हते अशा कठीण परिस्थितीत पृथ्वीराजबाबा यांनी मोठा संघर्ष करून कॉंग्रेस पक्ष टिकविला. तत्कालीन युती सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई केली. अनेक आंदालने मोर्चे काढले. महापूरात लोकांना स्थलांतरासाठी मदत केली. अन्नदान केले. वृक्षदानाची मोहिम राबविली. स्वत:ची लढाऊ आणि स्वच्छ चारित्र्यशील नेता ही प्रतिमा जनमाणसात निर्माण केली. परिणामी लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठीशी मोठी शक्ती असताना आणि वातावरण भाजपला अनुकुल असताना सुध्दा सन २०१९ विधानसभा निवडणूकीत पृथ्वीराजबाबा यांना निसटत्या मतांनी पराभव स्विकारावा लागला. परंतु ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्याच दिवसापासून पृथ्वीराजबाबा पुन्हा कामाला लागले. पराभवाने खचून न जाता त्यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी केली. निवडणूकीपेक्षा लोकांच्या सेवेला ते महत्व देतात. म्हणूनच महापूर असो की सांगलीकरांच्यावर आलेले कोणतेही संकट असो पृथ्वीराजबाबा मदतीसाठी तात्काळ धाव घेतात. मतदार संघात त्यांनी कोट्यवधींची विकास कामे आपल्या ताकदीवर खेचून आणली आहेत. पेन्शनचा लढा उभारला. सांगलीकरांच्या विविध समस्यांसाठी ते नेहमीच रस्त्यावर उतरतात. प्रशासकिय स्तरावर पाठपुरावा करतात. विकासाची नेमकी दिशा असणारे नेतृत्व म्हणून सांगलीकर त्यांच्याकडे पाहतात. शिवतिर्थावर शिवज्योत अखंड प्रज्वलीत करून त्यांनी ऐतिहासिक काम केले आहे. ख्रिश्‍चन धर्मियांच्या समस्या सोडविण्यासाठी ते धाऊन गेले. मुस्लिमांसाठी सुरू केलेल्या इस्तिमाला नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. हिंदूच्या विविध सन उत्सावांमध्ये असणारा त्यांचा सहभाग हा नेहमीच कौतुकाचा विषय ठरतो. रामनवमी, शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन असे विविध उपक्रम आता लोकोत्सव झाले आहेत. पृथ्वीराजबाबांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी आपल्या गुलाबराव पाटील होमोयोपॅथिक महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविलेली आरोग्य शिबिरे. कोणताही गाजावाजा न करता सांगली आणि आसपाच्या सर्व गावांमध्ये घरोघरी जाऊन ते आरोग्य सेवात देतात. सर्वसमावेशक कृतिशील नेतृत्व ही त्यांची प्रतिमा आहे.

एवढ प्रचंड काम उभे केलेले पृथ्वीराजबाबा सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. जयश्रीताई पाटील यांची मदनभाऊ गटाला न्याय देण्याची मागणी रास्त असली तरी आजमितीला जो उमेदवार जिंकणार आहे, त्याच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी व गटांनी उभे राहणे ही काळाची गरज आहे. वारंवार पृथ्वीराजबाबा यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही नेत्यांच्याकडून सुरू असतो. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी नेहमीच समोर येत असते. जयश्रीताई पाटील यांच्या गटाला न्याय देण्यासाठी माजी मंत्री काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीत  कदम व प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी पुढाकार घेणे गरजेचे होते. यापुढच्या काळातही त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. पृथ्वीराजबाबा यांनी सांगलीची विधानसभा जिंकावी आणि विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या सदस्य संख्येत भर पडावी अशी भूमिका सर्वजण ठेवतील का? त्यांना सोडून इतरांना उमेदवारी देण्याचा विचारही पक्षश्रेष्ठी करू शकणार नाहीत. जर केलाच तर स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे होईल. मदनभाऊ गटाला न्याय देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी नेमका मार्ग शोधायला हवा. आणि पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभे रहावे, अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.