प्रतिष्ठा न्यूज

नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक विचार उपयुक्त – प्रा. गणेश शिंदे

कोल्हापूर येथे डॉ. बापूजी साळुंखे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : “उक्तीप्रमाणे कृती करणारे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी महाराष्ट्राच्या तळागाळातील बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. त्या बापूजींचे आयुष्य्‍ा समजून घेतल्यास आपले जीवन समृध्द होइल असे प्रतिपादन प्रा.गणेश शिंदे यांनी केले.
ते कोल्हापूर येथे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 105 व्या जयंती निमित्त “ नवीन शैक्षणिक धोरण आणि डॉ. बापूजी साळुंखे ” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,
उपाध्यक्ष मा.नामदेवराव कांबळे, सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आणि कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलताना प्रा.गणेश शिंदे पुढे म्हणाले शिक्षण हे समाजाच्या उन्नतीसाठी असले पाहिजे. हे ओळखून शिक्षणाला सामाजिक भान देण्यासाठी बापूजीनी गुरुदेव कार्यकर्ते घडविले . डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांना स्वत:ला सिध्द करावे लागेल. शिक्षणातून आपण स्वाभिमानी होणे अपेक्षित आहे त्यासाठी शिक्षणातून सकारात्मक उर्जा निर्माण करता आली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणातील व्यापकता शिक्षकांनी अंगिकारली पाहिजे. आर्थिक, सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणा शिवाय दुसरा पर्याय नाही. नव्या शैक्षणिक धोरणातील कौशल्याधारित आणि नाविन्यपूर्ण शिक्षण या गोष्टींना डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपल्या शैक्षणिक तत्वज्ञानात याआधीच स्थान दिले आहे. त्यामुळेच संस्थेचे विद्यार्थी देशभरात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांनी “ एकवीसाव्या शतकातील विद्यार्थी घडविण्यासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया विकसित करण्यासाठी व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आव्हांनांना स्वीकारण्यासाठी सकारात्मक दृष्टीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना शिक्षक सजग असणे आवश्यक आहे. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यावर स्वार होण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे आणि समाजाभिमुख शिक्षणावर भर दिला पाहिजे. डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा, विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्याचे काम सर्वच गुरुदेव कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन त्यानी केले या प्रसंगी अभय रिसर्च सेंटरच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन केले. दुपारच्या चर्चासत्रात एस.एस.सी. बोर्ड, कोल्हापूरचे सचिव डी.एस.पवार आणि श्रीराम साळुंखे यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे प्रशासन सहसचिव प्राचार्य डॉ.आर. व्ही. शेजवळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली प्र.प्राचार्य प्रा.डॉ. महेश गायकवाड आणि डॉ. कविता तिवडे यांनी सूत्रसंचालन केले.अर्थ सहसचिव एस. एम. गवळी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी आजीव सेवक, आजीव सदस्य व संस्थेच्या सर्व शाखांतील मुख्याध्यापक, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.