प्रतिष्ठा न्यूज

तासगावात नाभिक बांधवाकडून वीर शिवा काशीद पुण्यतिथी साजरी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगांव : छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरून सुटका करण्यासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे वीर रत्न शिवा काशीद यांची 363 वी पुण्यतिथी( स्मृतिदिन ) श्री संत सेना महाराज मंदिर तासगाव येथे संत सेना सेवा संघ व नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.प्रमुख पाहुणे तासगावच्या स.पो.नि.सौ. विशाखा झेंडे यांच्याहस्ते विररत्न शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी सौ वैशाली सुरेश माने तसेच बाळासाहेब जाधव हें प्रमुख उपस्थित होतें.
यावेळी नाभिक समाजातील मुलांनी शिक्षित होऊन संघर्ष करून पुढे गेले पाहिजे,स्वतःचा आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे असे प्रतिपादन तासगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ विशाखा झेंडे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्यात सकारात्मकता असणे आवश्यक आहे,त्याचबरोबर कृतीही असणे गरजेचे आहे,जिद्द,चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, समाजानेही त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी तासगाव नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती किशोर गायकवाड म्हणाले,किल्ले पन्हाळा गडाला सिद्दी जोहरने घातलेल्या वेढ्यातून छ. शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी प्रति शिवाजी बनून स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे नाभिक समाजाचे रत्न नरवीर शिवा काशीद यांनी स्वामिनिष्ठा काय असते हे दाखवून दिले आहे असे प्रतिपादन केले.यावेळी पत्रकार दत्तात्रय सपकाळ,उमेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी स्वागत केले.सुमित माने यांनी आभार मानले.कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.