प्रतिष्ठा न्यूज

गणेशोत्सव 2023 : सांगली महापालिकेची 1 सप्टेंबर पासून गणेश मंडळांसाठी एक खिडकी उघडणार : उपआयुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सव 2023 साठी महापालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या सूचनेनुसार 1 सप्टेंबर पासून गणेश मंडळांसाठी एक खिडकी सुरू केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त राहुल रोकडे आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत श्री. रोकडे म्हणाले की, आगामी गणेशोत्सव लक्षात घेता गणेशोत्सव श्री आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्ती तसेच पॅचवर्क सुरू करण्यात येत आहे. उत्सव काळात दीड दिवसापासून ते 11 व्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंड संख्या वाढवणार आहे. तसेच सरकारी घाटावर, स्वामी समर्थ घाटावर विसर्जन साठी आवश्यक सर्व तयारी गणेशोत्सवापूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
तसेच गणेशमंडळांसाठी 1 सप्टेंबरपासून एक खिडकी सुरू केली जाणार असून चारही प्रभागात सहायक आयुक्त कार्यालयात 1 खिडकी सुरू केली जाणार आहे. याठिकाणी गणेश मंडळांसाठी सर्व परवाने एकच ठिकाणी दिले जाणार आहेत.
शासनाच्या सूचनेनुसार गणेश मंडळ आणि घरगुती गणेशोत्सवसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. यामध्येही सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करत निर्माल्य कुंडातून जमा झालेल्या निर्माल्यमधून खत निर्मिती केली जात आहे असेही रोकडे म्हणाले
सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असली तरी गणेशोत्सव काळात पाणी पातळी आवश्यक ठेवण्याबाबत जलसंपदा विभागाशी समन्वय साधून पाणी साठा ठेवण्याबाबत नियोजन केले जाईल असेही राहुल रोकडे यांनी सांगितले.

यावेळी उपआयुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की, मिरजेत मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन हे गणेश तळ्यातच केले जाणार आहे. यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा महापालिका तयार ठेवणार आहे. तरीही नागरिकांनी शाडूच्या पर्यावरण पूरक मूर्ती वापराव्यात असे आवाहनही उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. मिरजेतील स्वागत कमानीबाबत महापालिका आणि पोलीस विभाग समन्वयाने निर्णय घेईल असेही स्मृती पाटील यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.