प्रतिष्ठा न्यूज

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी समाज कल्याण कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली, दि. 3 : शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांची जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सविस्तर माहिती देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी तृतीयपंथीयासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा हेल्पलाईन क्रमांकाद्वारे संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती घ्यावी, समस्या व तक्रारी याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
तृतीयपंथीयांसाठी हेल्पलाईन कक्ष सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे सुरू करण्यात आला आहे. या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (0233) 2374739 आहे.
जिल्हा स्तरावर तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे, तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या  सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्याकामी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे यासाठी तृतीयपंथीयासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.