प्रतिष्ठा न्यूज

थेट चांदोली धरणातून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी पाणी घेण्यासाठी यापुढे पाठपुरावा करण्याचा सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी निर्णय Sangli

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता. २ : थेट चांदोली धरणातून सांगली महापालिका क्षेत्रासाठी पाणी घेण्यासाठी यापुढे पाठपुरावा करण्याचा एकमुखी निर्णय आज येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत झाला. नागरिक जागृती मंचतर्फे बोलवण्यात आलेल्या या बैठकीत आज जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, वास्तुरचनाकार प्रमोद चौगुले, जीवन प्राधिकरण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी एस. के. रांजणे आदींनी चांदोलीतून पाणी योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकीअंती निमंत्रक सतीश साखळकर यांनी पाठपुराव्याचा भाग म्हणून चांदोली योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कार्यवाहीसाठी येत्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.

प्रभाकर केंगार यांनी प्रास्ताविकात चांदोली धरणातून नैसर्गिक उताराने थेट सांगलीत पाणी कसे येते, याच्या तांत्रिक बाजू सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘सरासरी एक किलोमीटर अंतरासाठी तीन फुटांचा उतार मिळतो. साधारण ६३३ कोटी रुपये खर्च येईल. निर्धार केला तर अवघ्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण होऊ शकते.’’
प्रमोद चौगुले म्हणाले, ‘‘नद्यांचे प्रदूषण हे देशासमोरचे संकट आहे. केवळ सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात एक लाख टन रासायनिक खत उसासह सर्व पिकांना टाकले जाते. ही सर्व रसायने पाण्यातून पाझरत नद्यांमध्ये येतात. त्यामुळे येत्या काळात सर्व कारखाने, गटारांचे प्रदूषण थांबवले तरी शेतीचे प्रदूषण थांबवणे अशक्यप्राय आहे. राज्यातील सर्व मोठ्या शहरांना थेट धरणातून पाणीपुरवठा होतो, मग सांगलीला का नको?’’
विजयकुमार दिवाण म्हणाले, ‘‘म्हैसाळला ५३३ कोटींचा खर्च करून बॅरेजेस बांधले जाणार आहेत. ते झाल्यानंतर त्या पाण्याची फुग वारणा नदीत खोचीपर्यंत, तर कृष्णा नदीत डिग्रज बंधाऱ्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे महापालिका सध्या राबवत असलेली वारणा उद्‍भव योजना म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे ठरेल. चांदोलीतून पाणी आणण्यास जलसंपदा विभागाची पूर्ण संमती आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करून आपण ही योजना स्वबळावरहीपूर्ण करू शकतो.’’
एस. के. रांजणे म्हणाले, ‘‘चांदोलीतून पाणी हाच शुद्ध पाण्याचा शाश्‍वत स्रोत असू शकतो. घाई-गडबड कराल तर पुढच्या पिढ्यांचे नुकसान कराल. यापुढे सर्वांनी एकत्र येऊन योजनेचा पाठपुरावा करूयात. महापालिकेने त्या दिशेनेच पावले टाकावीत.’’
महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील म्हणाले, ‘‘महापालिकेने शासनाकडे वारणा उद्‍भव आणि चांदोलीतून पाणी अशा दोन्ही योजनांचे प्रस्ताव पाठवले आहेत. वारणा योजनेसाठी १३० कोटी, तर चांदोली योजनेसाठी ९०० कोटी रुपये खर्च येईल.’’
माजी आमदार दिनकर पाटील म्हणाले,‘‘ दोन्ही योजनांचा प्रस्ताव तयार करून गुणवत्तेच्या आधारे निर्णय करा. चांदोली योजनेसाठी आपण सर्वजण मिळून रेटा लावू. ’’ शेखर इनामदार म्हणाले,‘‘ योजनेला भाजपचा पुर्ण पाठिंबा आहे. तातडीने चांदोली योजनेसाठी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्ठमंडळाद्वारे आयुक्तांची भेट घेऊ.’’ संजय बजाज म्हणाले,‘‘ दोन्ही योजनांचा अभ्याय करण्यासाठी एजन्सी नियुक्त करताना स्थानिक तज्ज्ञ नागरिकांच्या सूचना घ्या. सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करा.’’ पद्माकर जगदाळे म्हणाले,‘‘ महापालिकेतून एकमेव चांदोलीतून पाणी योजनेचा ठरावच शासनाकडे पाठवून द्या. त्याला वेगवेगळे फाटे फुटणार नाहीत याची दक्षता घ्या. ’’ संतोष पाटील म्हणाले,‘‘ चांदोलीतून पाणी घेणे केव्हाही चांगलेच आहे. मात्र त्यासाठीचा निधी आणि देखभाल खर्च महापलिकेला परवडेल का याचा विचार केला पाहिजे. ’’ हनुमंत पवार म्हणाले,‘‘ महापालिकेकडून चांदोली योजनेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी जीवन प्राधिकरणकडे तातडीने प्रस्ताव द्यावा. हाच प्रस्ताव शासनाकडे गेला पाहिजे यासाठी एकमत तयार करुयात.’’
यावेळी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, हणमंतराव पवार , माजी नगरसेवक उत्तम साखळकर, पप्पू मजलेकर, संतोष पाटील, भारती दिगडे, स्वाती ताई शिंदे, गीतांजली थोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, विष्णू माने, हरिदास पाटील ,अमर निंबाळकर, राहुल पवार, महलिंग हेगडे, निलेश पवार, आर बी शिंदे सर, रवींद्र चव्हाण, सी ए देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, विनोद पाटील,महेश पाटील, गजानन साळुंखे, आनंद देसाई , तानाजी रुईकर, हेमंत मोरे, रुपेश मोकाशी, मुल्ला, महेश साळुंखे, डॉ संजय पाटील सर्जेराव पाटील, पैलवान पृथ्वीराज भैया पवार, मदन भाऊ पाटील युवा मंच चे शीतल लोंढे अविनाश जाधव उदय पाटील अमोल झांबरे, क्रीडाई चे रमेश खिलारे,
जयंत पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.