प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेकडून 15 ऑगस्ट रोजी एरो मॉडेलिंग शोचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभिनायातंर्गत 13 ते 15 ऑगष्ट दरम्यान मॅरेथॉन स्पर्धा, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, तिरंगा चषक कबड्डी स्पर्धा, शालेय विद्यार्थ्याची तिरंगा प्रतिकृती, एरोमॉडेलिंग शो अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
घरोघरी तिरंगा अभिनायातंर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात एक लाख तिरंगा ध्वजाचे वाटप घरपट्टी कर्मचारी आणि नगरसेवक यांच्या सहकार्याने सोमवारपासून सुरु करण्यात आले आहे.
आयुक्त कापडणीस पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त देशभरात दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात एक लाख ध्वज वितरण करण्याचे नियोजन सोमवारपासून सुरू झाले आहे. दि. 13 रोजी सकाळी एकाचवेळी घरांवर ध्वज फडकविले जाणार असून दि. 15 रोजी सुर्यास्थापूर्वी ध्वज उतरविले जाणार आहेत. याबाबतच्या सूचना घंटागाडीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. तसेच या तीन दिवसात ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून 150 तिरंगा रक्षकांची नियुक्ती प्रभाग निहाय केली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
शिवाय तीन दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. 13 ऑगस्टला सकाळी सात वाजता स्टेशन चौकातून मॅरेथॉन स्पर्धा, अकरा वाजता महापालिकेच्या सभागृहात उत्कृष्ट काम करणार्‍या सफाई कमर्चार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दि. 14 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता मनपाच्या सभागृहात स्वातंत्र्य सैनिक, कोरोनात काम केलेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर 75 विधवा महिलांना तिरंगा ध्वज प्रदान करण्यात येणार आहेत. सायंकाळी चार वाजता माईघाटावर तिरंगा बोट रॅली, सहा वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तिरंगा चषक कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
दि. 15 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दीड हजार शालेय विद्यार्थ्यांमार्फत मानवी तिरंगा प्रतिकृती साकरण्यात येणार आहे. साडेअकरा वाजता घरोघरी तिरंगा अतंर्गत एरोमॉडेलिंग शो होणार आहे. दीड तास 25 विमाने मॉडेलिंग शो करणार आहेत. तीन दिवस मनपा मुख्यालयाच्या इमारतीवर तिरंगा विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मनपा क्षेत्रातील थोर महापुरूषांच्या पुतळ्याला देखील विद्युत करण्यात येणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.