प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात शिवजयंती जल्लोषात साजरी; नव्या पिढीने शिवबांचा आदर्श घ्यावा : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि.१९ : छ. शिवाजी महाराजांची लढाई ही धार्मिक नव्हती तर गोरगरीब रयतेची अन्याय, अत्याचार, शोषण व पिळवणूकीतून सुटका व्हावी यासाठी केलेली बहुजन समाजाच्या दुःखमुक्तीची लढाई होती. म्हणून शिवबांनी पराक्रम गाजवून स्वराज्य मिळवून दिले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीने आपल्या कुटुंबाच्या व देशाच्या हितासाठी रचनात्मक कामे करुन कर्तबगारी करावी असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले. मिरजेत गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखी पूजनावेळी शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते.

छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरजेतील इतिहास प्रसिद्ध लक्ष्मणेश्वर महादेव मंदिरातून सकाळी १० वा. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या हस्ते पालखीतील शिवबांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व पूजन करुन बी. एच. एम. एस. विद्यार्थी व विद्यार्थींनींच्या लेझीम व झांजपथकाच्या निनादात पालखीचे कॉलेजवर आगमन झाले.

डॉ. पतंगराव कदम खुल्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा. बिरनाळे म्हणाले, “जगातील कोणत्याही राजाला जे ५०० वर्षात जमले नाही ते मानवतावादी कार्य शिवबांनी ३८ वर्षात करुन दाखवले. राजमाता जिजाऊ यांच्या सुसंस्काराचे हे फलित आहे. छ. शिवाजी महाराजांनी जात पात कधीच मानले नाही. ते सहिष्णु होते. रयतेचे कल्याण हाच खरा धर्म आणि कोणाचीही पिळवणूक व शोषण होऊ नये हा त्यांचा पायाभूत विचार होता. शिवजयंतीदिनी सुट्टीचा उपभोग न घेता छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी आणि राजमाता जिजाऊ व शिवबांच्या वेषातील गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने छ. शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करतात हे प्रकर्षाने जाणवले.

गुलाबराव पाटील मेडीकल महाविद्यालयाचे भावी डॉक्टर भगवे फेटे परिधान करून, झांज वाजवत, लेझीम खेळत, भगवा नाचवत पांढऱ्या शुभ्र पोषाखात बेभान होऊन छ. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार करताना जय शिवाजी – जय भवानी या गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्थापित केलेल्या अखंड शिवज्योतीतून नवी पिढी प्रेरीत झाल्याचे दिसून आले.

हा शिवजयंतीचा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील व विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, समन्वयक प्राचार्य डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी विद्यापीठ प्रतिनिधी जबीह शेख, व सहकारी मित्र विशाल बळवंतराव, शुभम गायकवाड, महेश झेंडे, साहील शिंदे, अविनाश राठोड, अजय अडे, प्रविण माने, रोहित काटकर, आकाश काटकर, अवधुत महाजन, अक्षय पाटील, अनिकेत गेजगे आदि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्कृष्ठ पध्दतीने केले.

यावेळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.