प्रतिष्ठा न्यूज

वालचंद अभियांत्रिकी महावि‌द्यालयात “Commencement Day” संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : औपचारिक अभियांत्रिकी शिक्षणाची यशस्वीपणे सांगता करून आपल्या व्यावसायिक जीवनात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा “Commencement Day” वालचंद अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वालचंद कॉलेजच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अजित गुलाबचंद व सांगलीचे खासदार आणि महावि‌द्यालयाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे सदस्य श्री. संजयकाका पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी संचालक प्रा. (डॉ.) उदय दबडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या गेल्या वर्षभरातील प्रगतीचा धावता आढावा घेतला व येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयामध्ये “Robotics and Automation” आणि “Artificial Intelligence and Machine Learning” हे दोन 60 प्रति प्रति क्षमतेचे पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच “Computer Science and Engineering” मध्ये 90 आणि “Information Technology” मध्ये 60 अशी प्रवेश क्षमता वाढण्यास विनाअनुदान तत्त्वावर AICTE कडून मंजुरी मिळण्याची घोषणा केली व Construction Management हा १२ प्रती प्रवेश क्षमतेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील नव्याने सुरू होत असल्याचे सांगितले. तसेच वर्किंग प्रोफेशनलसाठी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता मिळालेची घोषणा केली. श्री. संजयकाका पाटील यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या गौरवपूर्ण परंपरेचा उल्लेख केला आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही बाबतीत या महावि‌द्यालयाच्या पाठीशी उभे राहण्याचा आपला दृढ निर्धार प्रकट केला.

प्रथितयश उ‌द्योजक आणि महाविद्यालयाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अजित गुलाबचंद यांनी सर्वप्रथम “Commencement Day” या संकल्पनेचे पाश्चात जगामध्ये पूर्वीपासून प्रचलित असलेल्या परंपरेचे महत्त्व विशद केले. महावि‌द्यालयातून बाहेर पडल्यानंतरचे जग हे विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील विश्वासारखे सहज नसून प्रचंड आव्हानात्मक आहे. याची जाणीवकरून देतानाच त्या आव्हानांचा मुकाबला यशस्वीपणे करण्यासाठी स्वतःला सक्षम बनवणे आवश्यक असल्याच्या गरजेवर भर दिला. जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना धैर्यपूर्वक कृतीतून त्यावर मात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यावसायिक क्षेत्रात अजाणतेपणे चुका होणे हे क्षम्य असले तरी, मी कोणालाही जाणीवपूर्वक हानी पोहोचणार नाही हे व्यावसायिक मूल्य अंगी बसवणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विस्तारलेल्या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी टीमवर्क हे आवश्यक असून परस्पर विश्वास हाच टीमवर्कचा पाया असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद करताना विश्वासहार्यता जपण्यावर भर दिला. संपूर्ण जग हे आता या वि‌द्यार्थ्यांसाठी कार्यक्षेत्र असून व्यावसायिक जगाची विविध क्षेत्रे वालचंदीय अभियंत्यांनी व्यापून टाकावीत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यानंतर महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बी एन नाईक यांनी उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या वि‌द्यार्थ्यांना व्यवसायिक सचोटी जपण्याची प्रतिज्ञा दिली. 2024 च्या पदवी आणि 2023 च्या पदव्युत्तर वि‌द्यार्थ्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांची हस्तांदोलन केल्यानंतर निवडक विद्यार्थ्यांचा प्रतिनिधीक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयामुळे आपले आयुष्य घडल्याचे सांगितले.

यानंतर सर्व शाखा मधील 26 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके देऊन गौरवण्यात आले तसेच GATE, GRE मध्ये यश प्राप्त केलेल्या आणि स्वतःला सिद्ध करून प्रचंड स्पर्धेतून प्रथितयश कंपन्यांमध्ये नोकरी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना देखील गौरवण्यात आले. महाविद्यालयाच्या 2019 च्या बॅचची स्थापत्य अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आदिती चौगुले ने 2023 मध्ये यूपीएससी परीक्षेत IRS साठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिने आपले मनोगत व्यक्त करताना महावि‌द्यालयांमधील आपल्या शिक्षणाचा पाया घडवला असल्याचे नमूद केले.

यानंतर 2024 च्या बॅचमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांची निवड प्रक्रिया प्रभारी संचालक प्रा. (डॉ.) उदय दबडे यांनी विशद केली. कु. गौरी धनंजय मोहिते हिची सर्वोत्कृष्ट अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून तर श्री विनीत विकास पाटील ह्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड जाहीर केली व त्यांना सन्मानित करण्यात आले. महावि‌द्यालयाचे अधिष्ठता शैक्षणिक डॉ. अनंत कोकणे यांनी आभार प्रदर्शन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा सांगता झाली. डॉ. नारायण आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कौन्सिलचे सदस्य श्री. चकोर गांधी, श्री. अमोल चव्हाण, डॉ. मोहन वनरोट्टी तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास पाटील, महावि‌द्यालय विकास समितीचे सदस्य माजी महापौर श्री. सुरेश पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. चिदंबर कोटीभास्कर, श्री. मुकुल परीख, महाविद्यालयाच्या अर्थसमितीचे सदस्य व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. चे संचालक श्री. दीपकबाबा शिंदे, महावि‌द्यालयाच्या शैक्षणिक सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. एन.सी. शिवप्रकाश, प्रथितयश उ‌द्योजिका सौ. प्रभाताई कुलकर्णी, नामवंत वास्तुविशारद श्री. प्रमोद चौगुले हे उपस्थित होते. सुमारे 350 विद्यार्थी व पाचशेहून अधिक पालक उपस्थित असल्याने महावि‌द्यालयाचा परिसर फुलून गेला होता व सर्वजण आपल्या महाविद्यालयातील आठवणी सेल्फी व रिल्स या डिजिटल माध्यमामध्ये टिपून घेण्यामध्ये मग्न होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.