प्रतिष्ठा न्यूज

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 31 : 44-सांगली लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आली असून मतमोजणीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मतमोजणी संदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. मतमोजणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होता कामा नये. मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येकाने नियमांचे पालन करून मतमोजणीचे काम जबाबदारीने पार पाडावे.

मतमोजणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. 44-सांगली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक आणि एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोस्टल मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी प्रत्येक टेबलवर एक ARO, एक सुपरवायझर, दोन सहायक व एक सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ईटीपीबीएस मतांची मोजणी 20 टेबलवर होणार असून यासाठी दोन ARO व प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक, एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज 20 टक्के अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर मतमोजणीच्या अन्य अनुषंगिक कामकाजासाठी आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेवून मतमोजणी संदर्भातील आवश्यक सूचना त्यांना दिल्या. ज्या उमेदवारांनी अद्यापही मतमोजणी प्रतिनिधींची नियुक्ती केलेली नाही त्यांनी त्यांची नावे प्रशासनास कळवावी. मतमोजणी प्रतिनिधींनी मतमोजणी कक्षात वेळेत उपस्थित रहावे. मतमोजणी कक्षात मोबाईल, स्मार्ट वॉच वापरण्यास परवानगी नसल्याने कोणीही या वस्तू सोबत आणू नयेत. मतमोजणी कक्षात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये, गोपनीयता पाळावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.