प्रतिष्ठा न्यूज

मार्केट परिसरात एकेरी वाहतूक सुरू करा ; मिरज सुधार समितीची वाहतूक शाखेकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक (जुने अग्निशमन स्टेशन) ते दत्त्त चौक (लोणी बाजार) या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतुक सुरू करण्याची मागणी मिरज सुधार समितीने मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी नुकताच मिरज शहराचा पदभार स्विकारला. यावेळी मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आले. महाराणा प्रताप चौकातून महापालिका, प्रांत, तहसील, बांधकाम, मिरज न्यायालय आदी शासकीय कार्यालयेसह शाळा व महाविद्यालये आहेत. शिवाय, मिरज पूर्व भागातून याच चौकातून शहरात यावे लागते.
काही वर्षापूर्वी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक (जुने अग्निशमन स्टेशन) ते दत्त्त चौक (लोणी बाजार) या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतुक होती. मात्र, लोणी बाजारात भाजी बाजार भरला जात असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही. सध्या येथील भाजी बाजार हटविण्यात आला आहे.
महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक ते दत्त्त चौक (लोणी बाजार) या दोन्ही मार्गावर रिक्षासह अन्य चार चाकी वाहने एकमेकांच्या अडवे येत असल्याने अपघात व वादावादीचे प्रकारही घडत आहेत. म्हणून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करणे गरजेचे आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, अभिजीत दाणेकर, सलीम खतीब, वसीम सय्यद, सौ. गीतांजली पाटील, श्रीकांत महाजन आदी सदस्य उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.