प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र सावकरी अधिनियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) दि. 17 : सावकारांकडून होणा-या कर्जदार नागरीक व शेतक-यांच्या पिळवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी व सावकारीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम अंमलात आलेला आहे. सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ‍दिली.
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या अंमलबजावणी करीता त्रिसदस्यीय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था मंगेश सुरवसे तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सुनिल चव्हाण, बिपीन मोहिते,सहाय्यक निबंधक वैभव हजारे, दिपाराणी कोळेकर,अनिल कोळी, दाजी खताळ, अधिक्षक रविंद्र पत्रीमठ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सावकारी संबंधातील तक्रारी यंत्रणांनी वेळेवर निकाली काढाव्यात, परवाना नसतांना अवैध सावकारी करणा-यानां सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये पाच वर्षाचा कारावास व रु.50 हजार इतक्या दंडाची तरतूद कायदयात केलेली असून सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच कर्जदाराकडून कर्जास गहाण म्हणून सावकारी अधिनियमाप्रमाणे वचनपत्र, बंधपत्र इ. मध्ये चुकीची नोंद घेणे, कोरे ठेवणे, कोरा चेक बाँड घेणे यासाठी 3 वर्षे कारावास व रु.25,000/- इतक्या दंडाची तरतूद आहे. परवानाधारक सावकाराने कर्जदारास कर्ज दिल्याबाबतचे विहीत नमुन्यातील पावती अथवा पासबूक देणे, कर्जदाराकडून रक्कम घेतल्यानंतर त्याची विहीत नमुन्यातील पावती देणे, गहाण वस्तू स्विकारल्या असतील तर त्याची पावती देणे कायद्याने बंधनकारक आहे. जर कर्जदाराने त्याची स्थावर मालमत्ता, घर, शेत इ. कर्जाच्या ओघात खरेदीखत म्हणून करुन दिले असेल तर त्यामध्ये सावकारीच्या ओघात गहाण म्हणून खरेदीखत करुन देत आहे अशा स्वरुपाचा मजकूर खरेदी खतामध्ये कर्जदाराने नमूद करावा.
जी कोणी व्यक्ती कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदाराला उपद्रव देईल, तिच्यावर बळाचा वापर करील किंवा तिला धाकदपटशा दाखविल, जागोजागी पाठलाग करील, अथवा तिच्या अथवा तिच्या कुटुंबियाच्या जिविताला धोका असलेची खात्री झाल्यास अशा प्रकरणी सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने जिल्हा पोलीस अधिक्षक,सांगली अथवा संबंधीत पोलीस स्टेशन यांचेकडे संपर्क साधावा असे ही त्यांनी यावेळी सांगितले. सावकाराने अवैधरित्या बळकाविलेल्या जंगम व स्थावर मालमत्तेचा कब्जा कर्जदारास परत करण्याचे अधिकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 17 व 18 अन्वये जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, सांगली, यांना असलेने संबंधीत कर्जदाराने जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,सांगली कक्ष क्र.209, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली कार्यालय दुरध्वनी क्र.0233-2600300 ईमेल- ddr_sng@rediffmail.com यांचेकडे अथवा संबंधीत तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचेशी संपर्क साधावा.
तसेच परवानाधारक सावकारास त्याच्या परवान्यात नमूद कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कर्जवाटप करता येत नाही. सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी संबंधीत यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यानी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.