प्रतिष्ठा न्यूज

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सांगली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार : माजी मंत्री विश्वजीत कदम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी , दि. १४ : गेली काही वर्षे जाती-पातीच्या आधारावर देश विभागण्याचे काम सुरु आहे. महागाई, बेरोजगारीची समस्या प्रचंड असताना सरकार जनतेचे लक्ष विचलित करणारे दुसरेच मुद्दे पुढे आणत आहे. याविरोधात देशातील सामान्यांत संतापाची भावना आहे. काँग्रेस नेते, खासदार राहूल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतून जनता केंद्र सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत आहे. ही यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येत असून त्यात सांगली जिल्ह्यातून हजारो लोक सहभागी होतील, अशी माहिती कॉंग्रेस नेते माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात यात्रेबाबतची प्राथमिक चर्चा करण्यात आली. येथून हजारोच्या संख्येने लोकांनी सहभागी व्हावे. काँग्रेसच्या विचाराच्या लोकांनी, युवकांनी, युवतींनी, महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. कदम यांनी केले. आमदार तथा जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, जितेश कदम उपस्थित होते. “देशात असंतोष आहे. धर्म व जातींमध्ये पेच निर्माण करून वातावरण बिघडवण्यात आले आहे. देशात हुकुमशाही राजवट असून खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याचे पाप सरकारने केले आहे. या विरोधात राहूल गांधी प्रचंड पदयात्रा काढत असून ती आता कर्नाटकातून तेलंगणात आणि तेथून महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या ५ नोव्हेंबरच्या दरम्यान ती राज्यात येईल आणि नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातून पुढे मध्यप्रदेशात जाईल. त्यात आम्ही एकजुटीने, मोठ्या ताकदीने सहभागी होत आहोत. हजारो लोक त्यात असतील.”

सांगली लोकसभा हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. त्या परिस्थितीत राज्यातील जेष्ठ नेत्यांनी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचा अर्थ हा मतदारसंघ सोडला असा नाही. हा मतदारसंघ काँग्रेसचाच असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस जिल्ह्यात स्वावलंबी असून ताकदीचा पक्ष आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना जिल्ह्यात पक्षाच्यावतीने पदयात्रा काढली. ज्या भागात काँग्रेसची ताकद कमी आहे, तेथे देखील चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात पक्ष वाढीवर आणखी भर दिला जाईल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील ताकदीने लढल्या जातील, असे आ. कदम यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली आहे. मलिकार्जुन खर्गे व शशी थरूर यांच्यात लढत आहे. खर्गे जेष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी (ता. १६) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या चौकात ‘डॉ. पतंगराव कदम’ यांचे नाव दिले जाणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ हेही उपस्थित राहणार आहेत. श्री. पटोले यांच्या उपस्थितीत कुंडल येथे शेतकरी मेळावा होणार आहे, असेही विश्वजीत कदम यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.