प्रतिष्ठा न्यूज

बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला…ढवळी मुरूम चोरी प्रकरणात अमोल काळे यांचे प्रशासनाला आवाहन..

मंडल अधिकारी आणि मुरूम चोर यांच्यावर कारवाईसाठी लवकरच आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ढवळी गायरान आणि येळावी येथील मुरूम चोरी प्रकरणी मंडल अधिकारी शेटे आणि मुरूम माफिया यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी मनसे नेते अमोल काळे यांनी लवकरच उपोषण करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी बोलताना अमोल काळे यांनी मंडल अधिकारी अभयकुमार शेटे हे खऱ्या मुरूम चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत,जर मुरूम माफियानी मुरूम नेलाच नसेल तर मुरूम गेला कुठे आणि गेला असेल तर मंडल अधिकारी यांनी त्यांच्या वर कारवाई करावी बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असे आवाहन काळे यांनी केले आहे.याबाबत अमोल काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेटे यांची तक्रार सुद्धा केली आहे.
त्यात त्यांनी ढवळी येथील गायरान गट नं. 629 मध्ये मुरूम माफिया यांनी मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा केला आहे.त्यांना पाठीशी घालण्याचे काम मंडल अधिकारी अभयकुमार शेटे करीत आहेत.त्यामुळे शेटे यांच्यावरही कारवाई करा,अशी मागणी काळे यांनी केली आहे.काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,ढवळी येथील गायरान गट नं.629 मध्ये मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा करण्यात आला आहे.याबाबत तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.त्यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकारी शेटे यांना दिले आहेत.मात्र शेटे यांनी ढवळी येथील मुरूम उपसा 2017 – 18 मध्ये झाल्याचे म्हटले आहे.शेटे यांनी दिलेली ही माहिती चुकीची आहे.ढवळी येथील मुरूम उत्खनन अलीकडील काही महिन्यात झाले आहे.त्याचे फोटो आणि व्हिडिओ तहसीलदारांना दिले आहे. मात्र चुकीचा अहवाल देऊन शेटे हे मुरूम माफिया याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
याशिवाय येळावी येथेही गट नं. 1795/18 या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा झाला आहे. याठिकाणीही शेटे हे संबंधिताला पाठीशी घालत आहेत.त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी इ. टी. एस द्वारे मुरूम उपशाची मोजणी करून मुरूम तस्करांवर कडक कारवाई करावी.त्यांच्याकडून शासनाचा बुडवलेला महसूल वसूल करावा.तसेच याबाबत प्रशासन चाल ढकल करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लवकरच तासगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करनार असा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.