प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मुंबईत मतदान : सांगली जिल्ह्यातील १८ जणांना मतदानाचा अधिकार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १७ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या सोमवार, दि. १७ रोजी होत असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयात महाराष्ट्रासाठीचे मतदान सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, या निवडणुकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार श्री. मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे दुसरे खासदार शशी थरुर हे उमेदवार म्हणून उभे आहेत. महाराष्ट्रातून ५६१ मतदार असून त्यात सांगली जिल्ह्यातील १८ मतदारांचा समावेश आहे. मतदारांमध्ये जिल्हा प्रतिनिधी, विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य यांचा समावेश आहे. मतपत्रिकेद्वारे हे मतदान होणार आहे. ज्या उमेदवाराला मतदान करावयाचे आहे, त्याच्या नावासमोर बरोबर हे चिन्ह टाकावयाचे आहे. मतदानासाठी पक्षाचे ओळखपत्र, आधार कार्ड, आणि निवडणूक ओळखपत्र आवश्यक आहे.

ते म्हणाले, निवडणुकीतील उमेदवार मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते आहेत. कर्नाटकातून नऊ वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते राज्यसभेवर सदस्य आहेत. संसदेत विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करत आहेत. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांचा राजकारणाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. दुसरे उमेदवार शशी थरूर हे केरळमधून लोकसभेवर तीन वेळा निवडून आले आहेत. तेही अभ्यासू खासदार आहेत.

उद्या मतदान झाल्यानंतर दि. १९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत मतमोजणी होणार आहे. त्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण याचा निर्णय होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे असेही ते म्हणाले.
——–

सांगली जिल्ह्यातील मतदार असे

सांगली शहर : पृथ्वीराज पाटील, करीम मिस्त्री, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील

ग्रामीण विभाग : आ.डॉ. विश्वजीत कदम, आ. मोहनराव कदम, आ. विक्रम सावंत, शैलजाताई पाटील, विकास साळुंखे, सुमित गायकवाड, डॉ. दिग्विजय देशमुख, रवींद्र साळुंखे, दिगंबर पाटील माणिक भोसले, अप्पाराया बिरादार, नंदकुमार कुंभार, उत्तम पवार, बाळासाहेब पाटील

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.