प्रतिष्ठा न्यूज

संत गाडगे महाराज यांची सामाजिक शिकवण जपली पाहिजे : डाॅ. कैलाश करांडे ; पंढरपूर सिंहगड मध्ये गाडगे महाराज यांना अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. अशी सामाजिक शिकवण संत गाडगे महाराज यांनी दिली असून ती शिकवण आयुष्यभर जपली पाहिजे असे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात मंगळवार दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
या दरम्यान प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, प्रा. समाधान माळी, प्रा. अविनाश हराळे, कार्यालयीन अधीक्षक सिद्धेश्वर लवटे, अकाऊंटंट संजय बनकर, पांडुरंग परचंडे, योगेश नवले सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.