प्रतिष्ठा न्यूज

डॉ. सुरेश सावंत यांना विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड प्रतिनिधी दि.22 : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना, १०० वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाचा आशा सावदेकर स्मृतिपुरस्कार जाहीर झाला आहे. ह्या पुरस्कारासाठी डॉ. सावंत यांच्या ‘वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती’ ह्या अपारंपरिक विषयावरील संशोधनपर ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. ह्या ग्रंथात डॉ. सावंत यांनी बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध अधोरेखित केला आहे.
विदर्भ साहित्य संघ ही १०० वर्षांची वाटचाल पूर्ण करणारी महाराष्ट्रातील महत्त्वाची साहित्यसंस्था आहे. पूर्वी या संस्थेतर्फे केवळ विदर्भातील साहित्यिकांनाच पुरस्कार दिले जात असत. संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा पहिल्यांदाच विदर्भाबाहेरील साहित्यिकांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या १४ जानेवारी रोजी, म्हणजे संस्थेच्या १००व्या वर्धापनदिनी नागपूर येथे ह्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

डॉ. सावंत यांची कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य आणि संपादन इ. वाङ्मयप्रकारांतील ४५ पुस्तके प्रकाशित झाली असून शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या काही कविता व लेख समाविष्ट आहेत. ‘डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितेचा चिकित्सक अभ्यास’ ह्या विषयावर प्रबंधिका लिहून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी प्राप्त केली आहे.

ना. शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. सावंत यांनी संपादित केलेला ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे. डॉ. सावंत यांना राष्ट्रपती पुरस्कारासह प्रतिष्ठित साहित्य संस्थांच्या ३० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. सावंत यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. सावंत यांना नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार ( जीवनगौरव) प्राप्त झाला आहे.

विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक साहित्य संमेलने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, पुस्तक प्रकाशन समारंभांत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. डॉ. सावंत यांनी शंभरावर पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत, पुस्तकांची पाठराखण केली आहे.

२०१९मध्ये जळगाव येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
आचार्य विनोबा भावेप्रणीत सर्वोदय आश्रम ह्या संस्थेतर्फे डॉ. सावंत यांना ‘आचार्य’ उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. एक उपक्रमशील व प्रयोगशील मुख्याध्यापक तथा शिक्षणतज्ज्ञ असा त्यांचा लौकिक आहे. डॉ. सावंत यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त गतवर्षी ‘आचार्य’ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला आहे.

‘वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती’ हा ग्रंथ औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने प्रकाशित केला असून एका वर्षात त्याची पहिली आवृत्ती संपली आहे.
ह्या ग्रंथाला यापूर्वी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा भारत भाषाभूषण पुरस्कार मिळाला आहे. विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बालसाहित्यिक,लेखक,कवी डॉ.सुरेश सावंत यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.