प्रतिष्ठा न्यूज

‘पर्यावरणपूरक होळी साजरी करा,पोळी गरजूंना दान करा’ : विठ्ठल मोहिते

प्रतिष्ठा न्यूज
हरिपूर दि. ४ : जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, हवामानातील बदलामुळे सजीवसृष्टी व मानवी जीवनावर होऊ लागलेले गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी; आपण सर्वांनी पर्यावरणपूरक सण साजरे करूया. उद्या येणारा ‘होळी’ हा सणही सर्वांनी पर्यावरणपूरक साजरा करा. होळीत नैवेद्य म्हणून ‘पोळी’ न टाकता ती आपल्याच परिसरातील गरीब-गरजू व भूकेलेल्यांना द्या. असे आवाहन श्री. विठ्ठल मोहिते यांनी हरिपूर येथील श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना केले’.
‘राष्ट्रीय हरित सेना’ योजनेंतर्गत कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘आपण मोठ्या प्रमाणात नारळाच्या झावळ्या, लाकडे शेणी होळीमध्ये घालत असतो. या कृतीने निसर्ग आणि पर्यावरणाची हानी होत असते. छोटी प्रातिनिधिक होळी करा. आपण नव्या पिढीने आता डोळसपणे प्रत्येक कृती करणे आणि इतरांना समजावून सांगणे गरजेचे आहे. दूष्ट विचार-विकारांची होळी करून;सद्विचारांचे ,सत्कार्याचे स्फुल्लिंग चेतवले पाहिजे. प्रदूषणाचा महाराक्षस जगासमोर आ’वासून उभा आहे. भारतातील अनेक नद्या पाणी प्रदूषणात तर अनेक शहरे हवा प्रदूषणाच्या बाबतीत धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त आहेत. आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत आहेत.अशावेळी ‘पर्यावरण संरक्षण’ ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती प्रत्येकाने पार पाडली, तरच उद्याचे भवितव्य आशादायी ठरेल. होळीमध्ये पोळीसारखे पौष्टिक अन्नपदार्थ ‘नैवेद्य’ म्हणून न टाकता ,ती पोळी गरिबांच्या मुखात गेली तर आपल्या हातून सत्कार्य घडेल. खरी मानवता जपूया. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजूया.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. स्मिता बेनिचेटगे या होत्या. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक सुहास कोळी यांनी केले तर आभार राजकुमार हेरले यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.