प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिकेत 4 लाख 82 हजारांचा अपहार.. मुख्याधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे अवघ्या 48 तासात पैसे वसूल

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव नगरपालिकेतील रवी म्हेत्तर या करवसुली कर्मचाऱ्याने घरपट्टीमध्ये 4 लाख 82 हजार 852 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकिस आले आहे.2021 – 2022 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण झालेल्या घरपट्टी वसुलीच्या पावत्या वापरून म्हेत्तर याने हा अपहार केला आहे.याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले आहे.तसेच निलंबनापूर्वी त्याच्याकडून अपहाराची सगळी रक्कम वसूल करण्यात आली आहे अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
रवी म्हेत्तर याची तासगाव पालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती आहे, मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्याला घरपट्टी वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती.गेल्या अनेक वर्षांपासून तो हे काम करीत आहे.दरवर्षी मार्च अखेरीस घरपट्टी वसुलीच्या पावत्यांचे लेखापरीक्षण होते,त्यानंतर या पावत्यांची पुस्तके गठ्ठा बांधून रेकॉर्ड रूममध्ये ठेवली जातात.म्हेत्तर याने घरपट्टीमध्ये अपहार करण्याच्या हेतूने 2021 – 2022 या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण झालेल्या पावत्यांचे पुस्तक रेकॉर्ड रूममधून मिळवले.या पुस्तकातील तसेच जन्म – मृत्यू विभागातील एका पुस्तकातील अशा दोन्ही पुस्तकांमधून 78 पावत्या नागरिकांना दिल्या.या 78 पावत्यांच्या माध्यमातून त्याने 4 लाख 82 हजार 852 रुपये जमा केले.हे पैसे त्याने स्वतःच्या खिशात घातले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एकजण पालिकेत काही कागदपत्रे नेण्यास आला त्यावेळी पालिकेतून त्याला तुमची घरपट्टी थकीत असल्याचे सांगण्यात आले,मात्र संबंधिताने मी घरपट्टी भरली असून रवी म्हेत्तर हा कर्मचारी माझ्याकडून पैसे घेऊन गेला आहे त्याची पावतीही माझ्याकडे आहे असे त्याने सांगितले.त्यानंतर त्याच्याकडील पावतीची शहानिशा करण्यात आली.त्यावेळी ही पावती 2021 – 2022 च्या पुस्तकातील असल्याचे समोर आले.यानंतर मुख्याधिकारी पाटील यांनी म्हेत्तर याला बोलवून घेतले त्याच्याकडून घडलेला सगळा प्रकार लिहून घेतला. त्याच्याकडून सगळे 4 लाख 82 हजार 852 रुपये वसूल केले.त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केले.त्यानंतर आता त्याची अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे,या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल,असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांच्या समयसूचकतेमुळे पैसे वसूल…!
कर वसुली कर्मचारी रवी म्हेत्तर याने केलेल्या अपहाराची माहिती मिळताच मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी त्याला बोलावून घेतले.त्याला अपहाराची सगळी रक्कम नगरपालिकेत भरायला लावली. त्यासाठी त्याला एक दिवसाची मुदत दिली.अवघ्या 48 तासात त्याने 4 लाख 82 हजार 852 रुपये नगरपालिकेत भरले.ही रक्कम भरल्यानंतरच मुख्याधिकारींनी त्याला निलंबित केले.
याच ठिकाणी जर दुसरा एखादा अधिकारी असतात तर त्याने लागलीच म्हेत्तर याच्यावर गुन्हा दाखल करून अंग काढून घेतले असते.मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरिकांनी भरलेल्या पैशाचे काय,असा सवाल निर्माण झाला असता.हे सगळे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले असते.अनेक वर्षे कोर्टात तारखा चालल्या असत्या. यामध्ये नागरिकांची हेळसांड झाली असती.कारण त्यांना थकबाकीमुळे पालिकेतून कोणताही दाखला, कागदपत्रे देता आली नसती.मात्र मुख्याधिकारी पाटील यांनी समयसूचकता दाखवून म्हेत्तर याच्याकडून सगळी रक्कम वसूल केली.त्यानंतरच त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.मुख्याधिकाऱ्यांच्या या समयसूचकतेचे तासगावकरांकडून कौतुक होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.