प्रतिष्ठा न्यूज

स्त्री-पुरूष समानता: पृथ्वीराज पाटील फौंडशनचे उद्दिष्ट ; ‘बाईपण भारी देवा‘ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा शो व या चित्रपटातील कलाकारांची प्रकट मुलाखत उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : भारतीय संस्कृतीने कुटुंब व्यवस्थेत स्त्रीला मानाचे स्थान दिले आहे. स्त्री घराला घरपण देते, त्यासाठी आई, पत्नी, बहीण, मुलगी व अनेक भुमिका लिलया पार पाडते. तिच्यावर अन्याय होऊ नये, ती शोषणमुक्त रहावी. स्त्री-पुरूष समानता हा विचार समाजाच्या कृतित यावा. अशी मानसिकता समाजातील सर्व घटकांमध्ये निर्माण करणे हे पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे उद्दिष्ट आहे. स्त्रीला ब-यावेळा आपले समजून तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता दिसून येते. तिला गृहित धरून तिच्यावर अन्याय केला जातो. तिलाही मन आहे, स्वतःची मतं आहेत, तिचं स्वातृत्र्य व तिचं स्त्रीत्व जपण्याचा तिला अधिकार आहे. प्रत्येक पुरूषाने तिचे अस्तित्व व अस्मिता मानणारी सहिष्णुता जपली पाहिजे. हा संदेश समाजाला देण्यासाठी आम्ही ‘बाईपण भारी देवा‘ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा शो व या चित्रपटातील कलाकारांची प्रकट मुलाखत हा उपक्रम हाती घेतला या उपक्रमाला सांगलीकर महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. तमाम सांगलीकर महिलांना/रणरागिणींना सलाम! असे भावपुर्ण उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. पृथ्वीराज पाटील फौंडेशन व सई क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील भावे नाट्यमंदिरात बाईपण भारी देवा या चित्रपटातील दिग्दर्शक, निर्माता व कलाकारांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी गणेश प्रतिमेसमोर दिपप्रज्वलन झाले. यावेळी दिग्दर्शक, निर्माता व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रकट मुलाखतीमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी, ‘महिला आनंदी राहिल्या पाहिजेत, त्यांचे शोषण होता कामा नये. यामध्ये पुरूषांची जबाबदारी महत्वाची आहे. म्हणुन हा चित्रपट पुरूषांसाठी आणला’ असे सांगितले.
सुकन्या मोने-कुलकर्णी यांनी, ‘आम्ही सुध्दा सामान्य गृहणीच आहोत, कौटुंबिक मुल्ये जपा, सासूला आईसारखं नको तर आईच माना, कुटुंबातील सदस्यांना गुणदोषासह स्विकारा, मुलांना मोबाईल नको तर पुस्तक द्या, घराचा आकार महत्वाचा नाही तर नाती महत्वाची असतात’ असे प्रतिपादन केले.
‘सांगलीकरांना भेटून खुप आनंद झाला, वरून कितीही स्टायलीश, मॉडर्न दिसत असलो तरी, स्त्रीची आतुन परंपरा आणि संस्कृती जपण्याची धडपड ही असतेच. एकमेकांच्या चुका माफ करून कुटुंब व नाती सांभाळता आली पाहिजेत’. असे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या.
‘आपले मित्र कोण असावेत हे आपण ठरवू शकतो, निवडू शकतो परंतु कुटुंब कोणते असावे हे आपल्या हातात नाही. म्हणून कुटुंबातील सर्वांना आपलं मानुन सांभाळुन घेता आलं पाहिजे’. असे शिल्पा नवलकर म्हणाल्या.
निर्माता निखील साने यांनी ‘पृथ्वीराज पाटील फौंडेशन, सई क्रिएशन, पृथ्वीराज पाटील, विरेंद्र पाटील, यांनी अल्पकाळात परिश्रम घेवून केवळ सामाजिक बांधीलकीच्या भावनेतुन स्त्रिदाक्षिण्य म्हणून प्रकट मुलाखतीचा हा उपक्रम सांगलीकर महिलांच्या भल्यासाठी घेतला आणि भर पावसात सांगलीकर महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन भरभरून दाद दिली. म्हणून भावे नाट्य मंदिर खचाखच भरले,’ असे सांगुन सर्वांना धन्यवाद दिले. मयुरेश पाटील व मुक्ता नवले यांनी मुलाखती घेतल्या.
सई क्रिएशनच्या सौ. रेखा पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका शुभांगी साळुंखे, सांगली शहर महिला कॉंग्रेस उपाध्यक्षा आशा पाटील, चिटणीस क्रांती कदम, किर्ती देशमुख, विजया पृथ्वीराज पाटील, प्रियांका ऋतुराज पाटील व सई क्रिएशनच्या महिला सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.