प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी भरती विरोधात संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देणे, मराठा आरक्षण प्रश्न योग्यरितीने न हाताळणे, जात निहाय जणगनणा न करणे इत्यादी लोकविघातक निर्णय तात्काळ रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील विविध विषयांतर्गत अशांतता पसरविण्याच्या धोरण सुरू आहे त्या सर्व बाबींचा तिव्र निषेध करत हा कुटिल डाव हाणून पाडल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर्व सरकारी नोकर भरती ही कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि खानिकर्म विभागाने दि.6 सप्टेंबर 2023 रोजी घेतला आणि त्याची अंमलबजावणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत सुरू झाली आहे. तरुण मुलांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे असा उद्देश असताना सुद्धा आणि राज्यात वेगवेगळ्या विभागाअंतर्गत तीन लाख पदांच्या सगळ्या विभागांतर्गत पदे रिक्त असताना सुद्धा कंत्राटी पद्धतीने तहसीलदार व इतर पदे भरणे हे तरुण मुला-मुलींच्या भविष्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या नऊ कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे त्या सर्व कंपन्या भाजप आमदार व सरकार प्रेरित आहेत. यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होऊ शकते. सदर प्रक्रिया तात्काळ बंद करावी अन्यथा महाराष्ट्रात प्रचंड उद्रेक होऊ शकतो. म्हणून राज्यातील कंत्राटी नोकर भरतीला संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे.
तसेच महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सर्व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा समूह शाळा योजनेच्या नावावर बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 ते 20 पटसंख्याच्या 14783 शाळा आहेत. त्यात 1,85,467 विद्यार्थी असून 29,707 शिक्षक आहेत. या शाळा बंद करून शिक्षकांना सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे. “गाव तिथे शाळा” या संकल्पनेला यामुळे छेद बसणार असून समूह शाळांचा प्रस्ताव हा सर्वसामान्य जनता विरोधी असून गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेपासून लांब ठेवण्याचा शिक्षण विरोधी प्रकार आहे. दि.18 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या दत्तक शाळा योजनेच्या शासन निर्णय नुसार जिल्हा परिषद शाळांचे कंत्राटीकरण करून मोठमोठ्या भांडवलदार लोकांना शाळा चालवायला देण्याचा हा प्रकार असून शाळांच्या जागेवर सुद्धा डोळा ठेवण्याचा हा दुर्दैवी प्रकार आहे. कंत्राटी शाळा करण्यास व कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. नांदेड, संभाजीनगर, नागपूर व पुणे या सरकारी रुग्णालयात मागील 15 दिवसात 120 रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण दगावली आहेत. राज्यातील कोणत्याही सरकारी दवाखान्यात पुरेशी औषध, यंत्रसामुग्री व अध्यावत यंत्रणा नाही. हेच डॉक्टर बाहेर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. आरोग्य मंत्री व प्रशासनाचे राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यांवर लक्ष नाही. या उलट राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय ही कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचे ठरवले असून राज्यातील सरकारी रुग्णालयाचे सुद्धा खाजगीकरण करण्याचा दुर्दैवी व वाईट निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.7 ऑक्टोबर 2023 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खाजगी कंपन्या मार्फत कंत्राटी करत असल्याचा निर्णय घेतलेला आहे.हा सुद्धा निर्णय आरोग्य विभागाचे कंत्राटीकरण करण्याचा दुर्दैवी असून संभाजी ब्रिगेड याही विरोधात असून या संदर्भात तीव्र विरोध करणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्या कंत्राटी, सरकारी शाळा कंत्राटी, इथून पुढे शिक्षक सुद्धा कंत्राटी, आणि आता सरकारी रुग्णालय सुद्धा कंत्राटी पद्धतीने चालवायला देणार असून हे अत्यंत दुर्दैवी व लोक विघातक बाबआहे.
संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड कामगार संघटना मुंबईच्या वतीने दि.2 ॲाक्टोबर 2023 पासुन आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन चालु आहे परंतु शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.12 आक्टोबर रोजी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रचंड घोषणा बाजी करण्यात आली. धरणे आंदोलना नंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी- मा. डॉ अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष- संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष कोल्हे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- परमेश्वर पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- भगवान कदम, प्रदीप गुबरे, सुरज पाटील, अंकुश कोल्हे, स्वप्नील शिंदे, सतीश धुमाळ, कैलास पाटील, योगेश मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक कदम, अंकुश कल्याणकर, अजय असर्जनकर, मारोती मेंडेवाड, ब्रम्हांनद खिल्लारे, माधव डबके, नितीन कोकाटे, उत्तम डांगे, ज्ञानेश्वर धुमाळ, ज्ञानेश्वर हंगरगे, किरण वानखेडे, मोहन शिंदे यांच्या सह इतरांच्या उपस्थित देण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.