प्रतिष्ठा न्यूज

मॅडम तुम्हीच सांगा माझा वाढदिवस कधी असतो? संवेदनशील शिक्षिकेचे माणुसकीचे दर्शन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मुलांचे भावविश्व आई- वडिलांच्या प्रेमानं फुलत असतं पण, आयुष्य फुलण्याआधीच मातृ-पितृछत्र हरपले तर प्रेमाची एक मोठी पोकळी त्यांच्या विश्वात तयार होते.अस्वस्थ मनाला अनेक प्रश्न सतावतात. कवठेएकंद येथील शाळेतील अशाच एका मुलाने अन्य मुलांचे वाढदिवस साजरे होताना सवाल केला,मॅडम, माझा वाढदिवस कधी असतो? काळजात कालवाकालव झाली खरी, पण शिक्षिकेने मायेचे पंख पसरत त्या मुलाला वाढदिवसाची तारीख मिळवून देत शाळेतच मोठ्याने वाढदिवस साजरा केला.रिहान करण घाडगे या पहिलीतील मुलाची कहाणी वेदनादायी आहे.गरिबीच्या चटक्यांनी त्रस्त झालेल्या कुटुंबातील त्याचा जन्मापासूनचा प्रवास खडतरच राहिलाय.दीड वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे आकस्मिक निधन झाले,आजीने त्याचा सांभाळ केला आणि कोमेजलेले त्याचे आयुष्य शाळेत जाऊन पुन्हा फुलायला लागले.
तरीही सभोवतालच्या मुलांचे आयुष्य पाहून त्याच्या भाबड्या मनात अनेक प्रश्नानी घर केले.इतरांचे वाढदिवस पाहून तो मँडमना वारंवार विचारायचा,
मॅडम,माझा वाढदिवस कधी? विद्यार्थ्यांशी लळा असणाऱ्या वर्गशिक्षिका नूतन परीट यांनी त्याचा वाढदिवस साजरा करायच ठरवलं.
अंगणवाडीत जाऊन त्याची जन्मतारीख शोधली व ६ नोव्हेंबरला त्याचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा केला.मुख्याध्यापकांनी रिहानला कपडे आणले,येथील कापड व्यावसायिक पूनम पाटील यांनीही गिफ्ट म्हणून आणखी एक ड्रेस दिला.
६ नोव्हेंबर रोजी सोमवारी थाटात साजरा करण्यात आला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने रिहान घाडगेचा वाढदिवस साजरा केला.शाळेत केक कापून रिहानला शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.या आपुलकीच्या वाढदिवसाला संतोष आठवले,जावेद जमादार, तानाजी शिरतोडे, मुख्याध्यापक राजेंद्र सागरे, उपशिक्षक विशाल खाडे,तसेच कापडं व्यावसायिक पूनम पाटील या उपस्थित होत्या.जिल्हा परिषद शाळा एक मधील शिक्षकांच्या या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांमधून विशेष कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.