प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा जहागिरीची साक्ष देणारा…. ‘पळसंबे येथील पंत अमात्यांचा वाडा’ जहागिरीच्या काळातील हा वाडा म्हणजे गगनबावड्याचा मानबिंदू

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावड्याची जहागिरी आकाराने लहान असली तरी ऐतिहासिक कीर्तीचे दृष्टीने ती फार मोठी होती. एक तर शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे बी नुकतेच महाराष्ट्र भूमीत अंकुर धरू पहात असता, त्यावर मोगलांची टोळधाड आली. तेव्हा त्या अंकुराची अत्यंत कुशलतेने जोपासना व संवर्धन करण्यास गगनबावडा जहागिरीचे मूळ पुरुष रामचंद्र पंत अमात्य हेच कारण झाले. तेव्हा मराठ्यांच्या स्वराज्याचा नंतरच्या काळात जो एवढा विस्तार झाला, त्याचे बहुतांशी श्रेय रामचंद्र पंत अमात्यांच्या समय सूचक व योजक स्वभावाकडे जाते. अर्थातच या घराण्याचा मान मराठ्यांच्या इतिहासात फार मोठा आहे.
रामचंद्रपंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मत्सुद्दी व राजनीतीचे अफाट ज्ञान असलेले व्यक्तिमत्व.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनाही मोलाची साथ लाभली. मराठ्यांच्या अनेक राजवटीचा उत्कर्ष पाहणाऱ्या रामचंद्र पंताना छत्रपती राजाराम महाराजांनी ‘ हुकूमत पन्हाह ‘ किताब दिला व त्याचबरोबर गगनबावडयाची जहागिरी त्यांच्याकडे सुपूर्त केली.
१६६० साली शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून गगनगड जिंकून घेतला.( काही ठिकाणी १६५८ असा उल्लेख आढळतो ) व निळो सोमदेव व मुलगा रामचंद्र निळकंठ यांच्याकडे सुपूर्द केला.पुढे भगवंतराव पंत अमात्य यांनी १७०० मध्ये दुरुस्त केला.


कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर ५० किलोमीटरवर पळसंबे गाव आहे. तेथे हा पंत आमात्यांचा वाडा ‘ पंत अमात्यांचा वाडा’ म्हणून ओळखला जातो.
प्रवेशद्वारापासूनच घनदाट झाडांच्या सावलीत इतिहासाची साक्ष देत उभा असलेला भव्य व  दुमजली वाडा दिसतो. त्यांच्या भिंती, खांब,तुळ्या आणि पन्हाळी कौलासह आजही भक्कमपणे दिमाखात उभा आहे. मुख्य द्वारा वरच विरगळ, जुने अवशेष आणि दोन तोफा आपलं स्वागत करतात. वाड्यामध्ये मांडणी केलेल्या अनेक वस्तू तुम्हाला इतिहास काळात ओढून घेतात. जुन्या काळातील भांडी, ठासणीच्या बंदुका, तलवारी, दांडपट्टे. विशेष म्हणजे पाच पिढ्यांचा सुंदर पाळणा आजही दिसतो. जिरे टोप, पगड्यांच्या प्रतिकृती जतन करून ठेवल्या आहेत. वाड्यातील रचना, दिवानाखाना, बैठक व्यवस्था, खुर्च्या, झुंबर संग्रहित करून ठेवलेला खजिना डोळे दीपावणारा आहे. या वाड्याच्या वंशजानी  चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलेल्या आहेत.
हा जहागिरीच्या काळातील वाडा म्हणजे गगनबावड्याचा मानबिंदू आहे. कारण गगनबावडा च्या पंत अमात्यांनी मराठी साम्राज्य वाढवण्यास मोलाचा हातभार लावलेला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.