प्रतिष्ठा न्यूज

केळकर महाराज मठातील किर्तन परंपरेचा शताब्दि महोत्सव मंगळवार पासून सुरू होणार : दीपक केळकर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्रीराम निकेतन (श्री केळकर महाराज मठ), सांगली येथे इ.स. १९२४ पासून गेले चार पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन सुरु आहे. येत्या माघ वद्य प्रतिपदेस म्हणजेच दि. २५/२/२०२४ रोजी या केळकर घराण्यातील अखंड
नित्यकीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कीर्तनशताब्दि पर्वकाळाच्या निमित्ताने – मंगळवार दि.१३/२/२०२४ ते २७/२/२०२४ अखेर कीर्तनशताब्दि महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवात, प. पू. श्री शंकराचार्य करवीरपीठ, प.पू. श्रीजनार्दनमहाराज यरगट्टीकर, चिमड, प.पू. स्वामी मकरंदनाथ, श्री. इंद्रजित देशमुखसाहेब, ह.भ.प.श्री. चैतन्यमहाराज देगलूरकर, श्री. मंदारबुवा रामदासी, ह.भ.प.श्री. ऋषिकेष महाराज वासकर, श्री तुकाराम गाथा मंदिर अध्यक्ष ह.भ.प.श्री. पांडुरंगमहाराज घुले, पू. श्री शंकराचार्य, संकेश्वर, ह. भ. प. श्री शरदबुवा घाग अशा अनेक प्रसिध्द प्रवचनकार, कीर्तनकारांची प्रवचने व कीर्तने आयोजीत केली आहेत. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने –
कीर्तनास १०० वर्षे पूर्ण होत असलेल्या मुख्य दिवशी म्हणजेच, रविवार दि. २५/२/२०२४ रोजी सांगली शहरातून भव्य शोभा यात्रा आयोजीत केली आहे. अशी माहिती श्री राम निकेतनचे दीपक चंद्रशेखर केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी लाभ घ्यावा अशी इच्छा सर्व केळकर कुटुंबीयानी व्यक्त केली. सर्व कार्यक्रम श्री राम निकेतन, श्री बापूरावजी केळकर वाडा, सेनामंदिर रोड, गांवभाग सांगली येथे होणार आहेत.
किर्तन परंपरेची माहिती दीपक केळकर यांनी दिली.
श्रीरामनिकेतन, गांवभाग सांगली येथे प.पू.सद्गुरू श्रीतात्यासाहेबमहाराज कोटणीस यांच्या कृपाशीर्वादाप्रमाणे प.पू. सद्‌गुरू श्रीमामामहाराज तथा श्रीगोविंद अनंत केळकर यांनी आपल्या राहत्या घरी सद्‌गुरू सेवाबुद्धिने व आपुलीया सुखस्वार्था या भूमिकेने अखंड नित्य हरिकीर्तन सुरू केले. तो दिवस होता, माघ व.१, इ.स. १९२४. प.पू.श्रीमामामहाराजांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रकृती अती गंभीर असतानाही हे कीर्तन इ.स. १९६२ अखेर अखंड ३८ वर्षे केले. हेच अखंड हरिकीर्तन त्यांचे अधिकारी सुपुत्र संत शिरोमणी प.पू. सद्‌गुरू श्रीदासराममहाराज तथा श्रीरामराय गोविंद केळकर यांनी पितृआज्ञेप्रमाणे निर्याणापर्यंत इ.स.२००१ अखेर अखंड ३९ वर्षे केले. पुढे श्रीदासराममहाराज यांचे अधिकारी सुपुत्र श्रीचंद्रशेखर रामराय केळकर तथा श्रीअण्णामहाराज, ज्यांचा उल्लेख अनेक महात्म्यांनी विनम्र प्रतिमा व निर्मळ अभिव्यक्ती असा केला, यांनी हे नित्यकीर्तन अखेरच्या श्वासापर्यंत इ.स.२०२० अखेर अखंड १९ वर्षे केले. त्याहीपुढे हे नित्यकीर्तन आजपावेतो चौथ्या पिढीतही तितक्याच पावित्र्याने, निष्ठेने अखंड सुरू आहे. या अखंड कीर्तनास माघ व.१, दि. २५.०२.२०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जयंती, पुण्यतिथी किंवा इतर गोष्टींची शताब्दि होणे व एकाच घराण्यात पिढ्यान्पिढ्या एकही दिवस खंड न होता अखंड नित्यकीर्तन १०० वर्षे होणे यात फार मोठा फरक आहे. अशी कीर्तन शताब्दि जगाच्या पाठीवर कोठे असेल असे वाटत नाही. म्हणून याचे अत्यंतिक महत्त्व आहे.

माघ व.१, इ.स. २०२३ ते माघ व.१, इ.स. २०१४ हे वर्ष कीर्तनशताब्दि वर्ष म्हणून साजरे होत आहे. या शताब्दि अंतर्गत १०० कीर्तने / प्रवचने, आरोग्य शिबीर, धार्मिक होमहवन, केळकरांचे कुलदैवत श्रीरामेश्वर, सोमेश्वर व बांदेश्वरी येथे धार्मिक विधी, सामुहिक पखवाज वादन, मनाचे श्लोक पढण, स्वच्छता अभियान, राम कथा यज्ञ असे कार्यक्रम झाले/होत आहेत. यातील १०० कीर्तने / प्रवचनांमध्ये सर्व अध्यात्मिक परंपरा, अनेक पीठाधीश, अध्वर्यू यांचा व्यापक समावेश केला आहे. कारण श्रीरामनिकेतन या स्थानाची अद्वैतपीठ म्हणून गेली अनेक वर्षे सर्वदूर ख्याती आहे.

दि.१३.०२.२०२४ ते २७.०२.२०२४ म्हणजेच माघ शु.४ गणेश जयंती ते माघ व. ३ गुरुतृतिया अखेर १५ दिवसांचा कीर्तन शताब्दि महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवात खालील कार्यक्रम नियोजित आहेत. १) प्रवचने/कीर्तने (रामदासी, नारदीय व वारकरी) २) ग्रंथप्रकाशन सोहळा, ३) भव्य शोभा यात्रा (हत्ती, घोडे, उंट, वाजंत्री, भजनीमंडळे अशा लवाजम्यासह), ४) किमान १०००० लोकांना अन्नदान, ५) अध्वर्यू, महनीय व्यक्ती, समाजातील मान्यवर यांचा यथोचित मान-सत्कार, ६) मुख्य दिवशी म्हणजे माघ व.१ दि.२५.०२.२४ रोजी अध्वर्यू संतांच्या उपस्थितीत कीर्तन शताब्दि सांगता सोहळा.

तसेच या शताब्दिच्या निमित्ताने ‘कीर्तन तरंगिणी’ हा कीर्तनविषयक विशेषांक प्रकाशित होणार आहे. यामध्ये विशेषतः कीर्तन हा मुख्य विषय केंद्रस्थानी ठेवून त्यासंबंधित प्रामुख्याने अध्वर्यू, पीठस्थ, विविध कीर्तन परंपरा असणाऱ्या घराण्यांचे वंशज, साहित्यिक, इत्यादिंचे कीर्तनाच्या परंपरा, पद्धती, मर्यादा, वैशिष्ट्ये, प्रकार इ. अनेक विषयांवरील लेख समाविष्ट आहेत. या निमित्ताने कीर्तनाची व्यापकता व वैशिष्ट्ये वाचकांना एकत्रितरुपाने सहज वाचण्यास उपलब्ध होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.